अलिबाग: त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे. त्रिभाषा सूत्राला काँग्रेसचा विरोध आहे. पण मोर्चात काँग्रेस सहभागी होणार का हा मुद्दा महत्वाचा नाही असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या मोर्चातील सहभागाबाबत संभ्रम कायम ठेवला आहे.

आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ते अलिबाग येथे युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात आज युत्या आघाड्यांची अपरिहार्यता आहे. पण या युती आणि आघाडीची किमंत काँग्रेस पक्षाचा चूकवावी लागली आहे. क्षमता असूनही पक्षाला निवडणुका स्वबळावर लढवता आल्या नाहीत. पक्षाला योग्य पध्दतीने संधी मिळू शकली नाही. हे वास्तव आहे. पण आगामी काळात यात गुणात्मक बदल कसे करता येतील यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे काम पक्षाने सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबाबत जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देणार आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी होतील याबाबत अजून स्पष्टता नाही. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आम्ही लढलो. आज देखील आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी कटीबध्द आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये आघाडी करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा आणि तालुका कमिट्यांकडे असणार आहे. याची पूर्व कल्पना आम्ही मित्रपक्षांना दिली आहे. या निवडणूकांची तयारी करण्यासाठी आम्ही निरीक्षक नेमले आहे. जिल्हा आणि तालुका कमिट्या जो निर्णय घेतील त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश पातळीवरून केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिभाषा सुत्राला आमचा विरोध आहे. १६ एप्रिलला हा शासन निर्णय झाला होता. १७ एप्रिलला सर्वात आधी या त्रिभाषा सुत्रा बाबतचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. यानंतर हा निर्णय मागे घेतला जाईल असे सांगीतल पण तसा शासन निर्णय काढला गेला नाही. आता भाजपने त्रिभाषा सुत्र पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यास काँग्रेसचा विरोध आहे. विविध आंदोलनामाध्यमातून काँग्रेसने या त्रिभाषा सुत्राला विरोध दर्शवला आहे. मात्र ५ तारखेच्या शिवसेना आणि मनसेनी मुंबईत आयोजित केलेले मोर्चात काँग्रेस सहभागी होणार का असा प्रश्न विचारला असता, काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होणार नाही होणार हा मुद्दा महत्वाचा नाही. मराठी भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण व्हायला पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे असे म्हणत त्यांनी मोर्चातील काँग्रेसच्या सहभागाबद्दल स्पष्ट बोलणे टाळले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, निरीक्षक श्रीरंग बर्गे, योगेश मगर उपस्थित होते.