अहिल्यानगर: बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील उर्दू शाळेजवळील गोमांस विक्रीस वापरले जाणारे वादग्रस्त शेड बेलापूर ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले. आठ दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला असता गोमांस विक्री होत असल्याचे आढळले होते.

त्यावेळी संबंधितांवर कारवाई करून त्याच्याकडून ७५ किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त गोमांस आहे की नाही, याची खात्री करण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, बेलापूर गावातील हिंदुत्ववादी व व्यापारी संघटनांनी वादग्रस्त शेड काढण्याची मागणी बेलापूर ग्रामपंचायत, श्रीरामपूर शहर पोलीस, तहसीलदारांकडे केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याची दखल घेत बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त पत्र्याचे शेड काढले व तेथील साहित्य ग्रामपंचायतने जप्त केले. त्याचबरोबर परवानगी न घेता सुरू केलेली बेकरी ३ दिवसांत बंद करण्यात यावी, अन्यथा बेकरी सील करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने एकास बजावली आहे. या कारवाई वेळी जि. प.चे माजी सदस्य शरद नवले, सरपंच मीनाताई साळवे, ग्रामविकास अधिकारी नीलेश लहारे, अरविंद साळवी, बाबुराव पवार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, सहायक निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर, ज्ञानेश्वर वाघमोडे, रवींद्र अभंग आदी उपस्थित होते.