scorecardresearch

“शरद पवारांशी सहमत, मात्र….,” दौरे न करण्याच्या सल्ल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी जे आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.

“शरद पवारांशी सहमत, मात्र….,” दौरे न करण्याच्या सल्ल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
आपला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरुच ठेवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. (फोटो सौजन्यः नारायण राणे ट्विटर)

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते.”

हेही वाचा – पूरग्रस्त भागातील दौरे टाळा; शरद पवारांचं राजकीय नेत्यांना आवाहन

फडणवीस पुढे म्हणाले, “सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे शरद पवार यांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारच आहे.”

आणखी वाचा – शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर म्हणतात, “स्वतः काही करायचं नाही आणि…”

दरम्यान, आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात काही जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यात घरगुती वापराच्या वस्तू, सॅनिटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या