Central Government Approves Rs 1,500 crore For Flood-Affected Farmers In Maharashtra: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ साठी महाराष्ट्र आणि कर्नाटकला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून १,९५०.८० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत करण्यासाठी दोन्ही राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १,५६६ कोटी रुपये आणि कर्नाटकच्या वाट्याला ३८४ कोटी रुपये आले आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने हा निधी मंजूर केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा दुसरा आगाऊ हप्ता, आणखी १,५६६.४० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. ही आगाऊ मदत असून, अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या वर्षी, केंद्राने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये आधीच जारी केले आहेत.
याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधीमधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नऊ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ३१ जिल्हयांतील २५३ तालुके बाधित झाल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच या तालुक्यातील बाधितांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते.