सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून एमआयएममध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून उमेदवार देण्याच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. केवळ भाजपला मदत व्हावी म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी हे उमेदवार उभा करण्याच्या खटपटीत आहेत, असा थेट आरोप या पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस कोमारोव्ह सय्यद यांनी केला आहे.

यासंदर्भात सय्यद यांच्यासह शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष रियाज सय्यद, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष तौसीफ काझी आदी पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजीनामे देण्याचा निर्णय घोषित केला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे एमआयएमला धक्का बसला आहे.

हेही वाचा…प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल

सोलापुरात लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठोपाठ एमआयएमकडूनही उमेदवार उभा करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेले तत्कालीन राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी हे प्रयत्नशील आहेत.

परंतु पक्षाने उमेदवार दिल्यास भाजपविरोधी मतांमध्ये मोठी विभागणीहोऊन त्याचा फायदा शेवटी भाजपलाच होण्याची शक्यता असल्याचे कोमारोव्ह सय्यद यांनी सांगितले. एमआयएम पक्षाचा भाजप हा शत्रू क्रमांक एक पक्ष असताना त्याच पक्षाला फायदा होईल, असे धोरण अंगिकारणे चुकीचे आहे. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने एकत्र येऊन प्रकाश आंबेडकर यांना उभे केले होते.

हेही वाचा…“अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंविरोधात तुफान टोलेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी आंबेडकर यांनी एक लाख ७० हजार मते घेतली होती. परंतु मतविभागणी होऊन एक लाख ५८ हजार मतांच्या फरकाने सुशीलकुमार शिंदे यांना विजयापासूनस ‘वंचित’ राहावे लागले होते. भाजपला त्याचा मोठा फायदा झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात एकीकडे पक्षाची कसलीही निवडणूक यंत्रणा तयार नाही. परंतु पक्षाचे नेतृत्व केवळ वैयक्तिक लाभासाठी उमेदवार उभा करण्याचा खटाटोप करीत आहेत, असा आरोप पक्षाचा राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला. पुढील राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे कोमारोव्ह सय्यद यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.