scorecardresearch

दादा भुसेंच्या पुत्राचा भावी खासदार असा उल्लेख  झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता

नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या नावाचे ‘भावी खासदार’ या मुख्य शीर्षकाखाली  फलक धुळय़ातील चौकांमध्ये झळकले आहेत.

दादा भुसेंच्या पुत्राचा भावी खासदार असा उल्लेख  झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

संतोष मासोळे

धुळे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच स्थानिक पातळीवर मित्रपक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आपले संपर्क दौरे वाढविल्याने ठिकठिकाणी भाजपची डोकेदुखी वाढली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघही यास अपवाद ठरलेला नाही. नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या नावाचे ‘भावी खासदार’ या मुख्य शीर्षकाखाली  फलक धुळय़ातील चौकांमध्ये झळकले आहेत. विशेष म्हणजे वाढदिवस मागील महिन्यातच झाल्यावरदेखील हे फलक अजूनही कायम असल्याने स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

 भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी  रणनीतीला चालना दिली आहे. शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेत असले तरी आगामी निवडणुकांसाठी अशीच मैत्री राहील की नाही याबद्दल दस्तुरखुद्द शिंदे गट आणि भाजपही आश्वस्त नाही. आविष्कार भुसे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या वर्षभरात युवकांचे मोठे संघटन करण्यावर भर दिला आहे आगामी निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्फे विविध प्रकारे राजकीय अंदाज घेणे सुरू झाले आहे. प्रस्थापितांसमोर मतांची बेरीज-वजाबाकी नेमकी कशी ठेवावी लागेल, याचे गणित आतापासूनच मांडले जात आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भुसे पुत्र आविष्कार हे उमेदवार म्हणून असतील, अशी वातावरणनिर्मिती भुसे समर्थकांकडून करण्यात येत असली तरी मंत्री भुसे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. आविष्कार यांच्या समर्थकांनी फलक लावले असतील, तसे असेल तर ते फलक काढून घ्यावेत, असे आपण सांगितले असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले असले तरी अजूनही फलक जागेवरच असणे, याला वेगळा अर्थ प्राप्त होत आहे.  आविष्कार भुसे यांचे आणि संसद भवनाचे छायाचित्र या फलकांवर लावण्यात आल्याने शिंदे गटाने विरोधकांना सूचक इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. यामुळे धुळे मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले डॉ. सुभाष भामरे यांच्या गोटात धाकधूक वाढली आहे.

दादा भुसे यांचा संपर्क

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण अशा सहा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी मालेगाव बाह्यमध्ये मंत्री दादा भुसे यांची मोठी ताकद आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून भुसे हे चार वेळा निवडून आले आहेत.  धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भुसे यांनी याआधी काम केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत त्यांचा मोठा संपर्क राहिला आहे. जिल्ह्यातील तरुण वर्गात मराठा कुणबी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि हिंदूत्ववादी नेते अशी भुसे यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. याचा राजकीय फायदा उचलण्याचे प्रयत्न आविष्कार भुसे यांच्या माध्यमातून होत असल्याचे संकेत आहेत. आविष्कार यांचा विवाह शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येशी झाला आहे. त्यामुळे त्याचाही राजकीय लाभ आविष्कार यांना मिळू शकतो, असे गणित आहे.   असे असले तरी भाजप-सेना युतीत धुळे लोकसभा मतदारसंघ कायम भाजपच्या वाटय़ाला आलेला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ आमच्या वाटय़ाचा आहे. आमचा उमेदवार निवडून येतो. लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती झाली तर वाटाघाटीत येणाऱ्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संयोजक बबन चौधरी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या