पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी नांदेडला जाहीर सभेत बोलताना ‘बहेन से कोई छीन लेता है..?’ अशा टोकदार शब्दांत माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यावरील अन्यायावर भाष्य केले होते. आता खतगावकरांनी आपली नाराजी उघड केल्याने खासदार अशोक चव्हाण यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे खतगावकर यांच्याऐवजी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी भाजप उमेदवाराच्या प्रचारास आलेल्या मोदी यांनी चव्हाण यांच्यावर हल्ला चढविताना ‘त्यांनी तर बहिणीच्या यजमानांची उमेदवारी हिसकावून घेतली,’ अशी टीका केली होती. आपल्या खास शैलीत मोदींनी उपस्थित केलेला हा सवाल जिल्हाभर गाजला. खतगावकर त्यावेळी चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय होते. मोदींनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावर त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही; पण चव्हाण खासदार झाल्यानंतर गेल्या ३ महिन्यांत आलेल्या एकंदर अनुभवातून त्यांनी आपल्या मनातील खदखद नुकतीच उघड केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाण यांना नव्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाशी संबंधित प्रकरणात चव्हाण यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याने ते तणावमुक्त झाले खरे; पण त्याच दिवशी नांदेडला मुक्कामी असलेल्या खतगावकर यांनी मात्र चव्हाण व त्यांच्या कंपूबद्दलची नाराजी, त्यामागची कारणे उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
खतगावकर यांच्या नाराजीनंतर चव्हाण मुंबईला गेले, त्यावेळी आपल्या दाजींची नाराजी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी खतगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दूतही पाठविला, पण स्वाभिमानी खतगावकरांनी चर्चेचे ‘कवाड’ बंद ठेवले! ‘आता बाण सुटला आहे’ अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर खतगावकर यांनी वेगळा पर्याय वा मार्ग नक्की केला असावा, असा अर्थ लावला जात आहे. गेले काही दिवस त्यांच्या निकट असलेल्या कार्यकर्त्यांने भास्करराव भाजपमध्ये जाऊ शकतात, असेही सूचित केले.
या संदर्भात थेट खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘थोडे थांबा,’ एवढेच भाष्य त्यांनी केले. दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जामात असलेले भास्करराव काँग्रेस सोडून खरेच भाजपत सामील होतील काय, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, भाजपतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशी कुणकुण लागली असल्याचे दिसून आले. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्य म्हणून संधी देण्याची हमी खतगावकर यांना लोकसभा निवडणुकीआधी देण्यात आली; पण नंतर शब्द फिरवण्यात आला. गेल्या काही आठवडय़ात स्वकीयांकडून मानभंग झाल्याने त्यांनी वेगळा मार्ग निश्चित केल्याचे बोलले जाते. खतगावकरांच्या नाराजीवर स्वत: अशोक चव्हाण व त्यांच्या निकटवर्तीयांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
खतगावकर यांच्या नाराजीने चव्हाणांच्या गोटात अस्वस्थता!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी नांदेडला जाहीर सभेत बोलताना ‘बहेन से कोई छीन लेता है..?’ अशा टोकदार शब्दांत माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यावरील अन्यायावर भाष्य केले होते.

First published on: 01-08-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disturbance in ashok chavan group due to mp bhaskarrao khatgaonkar