धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न जीवाशी आला होता, मात्र केवळ दैव बलवत्तर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे एका तरुणीला आपले नशीब रेखाटण्याची पुन्हा एकदा संधी दैवाने दिली. बुर्ली (ता. पलूस) येथील ही भाग्यवान तरुणी आहे मारिया बाबासाहेब सदामते. किर्लोस्करवाडी स्थानकावर रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, काल सायंकाळी कोल्हापूर ते गोंदिया जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस वाडी स्थानकावरून मार्गस्थ होण्याच्या वेळेस मारिया रेल्वे डब्यात चढण्यासाठी धावली. गाडीची गती धिमी होती. मात्र चढण्याच्या प्रयत्नात तिचा पाय घसरला. ती गाडी खाली जाऊ लागली. बोगी क्रमांक ८ या डब्याची पायरी व पदपथचे कठडे यामध्ये अडकून धावत्या रेल्वेसोबत ती तशीच घसटत निघाली. सुमारे १०० फूट ती घसटत निघाली होती. पदपथ आणि रेल्वे डब्याची पायरी या दोन्हीच्या मध्ये तिचे कंबरेखालील शरीर अडकले होते.

मििलद मानुगडे यांनी हा प्रकार रेल्वे प्रबंधक दिनेशकुमार व आर. एस. वानखेडे यांना सांगितला. यामुळे तत्काळ गाडीही थांबविण्यात आली. मात्र तिला तिची सुटका करणे अशक्य होते. पहार आणूनही सिमेंटचे कठडे अथवा डब्याची पायरी काढल्याशिवाय तिची सुटका होत नाही हे लक्षात येताच किर्लोस्कर कंपनीत कळविण्यात आले. कंपनीच्या आपत्कालीन पथकाने तत्काळ गॅस कटर, अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली. गॅस कटरने रेल्वे डब्याची पायरी कापण्यात आली. आणि एक तासाच्या प्रयत्नाने तरुणीला जीवदान मिळाले. तिला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.