scorecardresearch

दशकभरानंतरही अमरावतीतील प्रकल्प रखडलेलेच

अमरावतीनजीकच्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लिमिटेडने (बीडीएल) क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यास दशकभरापूर्वी मंजुरी दिली होती.

भारत डायनॉमिक्स लिमिटे (संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारत डायनॉमिक्सचा क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प, बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना या प्रकल्पांची रखडगाथा कायम असतानाच फिनले मिलचाही प्रश्न कायम आहे. या प्रकल्पांच्या उभारणीकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  अमरावतीनजीकच्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लिमिटेडने (बीडीएल) क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यास दशकभरापूर्वी मंजुरी दिली होती. ११ डिसेंबर २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले. पण त्यानंतर या प्रकल्पाचे काम इंचभरही पुढे सरकू शकलेले नाही. केवळ संरक्षण भिंत उभारण्यात आली. या प्रकल्पात हवेतून मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ५३३ एकर जमीन देण्यात आली आहे. भारत डायनॉमिक्स या प्रकल्पासाठी सुरुवातीला २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास गुंतवणूक ८२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. १९७० मध्ये सशस्त्र दलांची गरज पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे व संबंधित संरक्षण उपकरणे उत्पादित करण्यासाठी बीडीएलची स्थापना करण्यात आली होती. फ्रान्सच्या एरोस्पाटियाल यांच्या तांत्रिक सहकार्याने अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एटीजीएम) निर्मितीचे काम बीडीएलने सुरू केले आहे. कंपनी आता अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा बनविण्यासाठी डीआरडीओ आणि सशस्त्र दलांसह भागीदारीत कार्य करते. भारत सरकारकडून मिळालेल्या मागणी आणि परवानग्यांच्या आधारे अधिक निर्यातीसाठी प्रयत्न केले जात आहेत. बीडीएल कंपनी सध्या जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, टारपीडो, साधक आधारित मल्टीरोल एअर डिफेन्स क्षेपणास्त्र किंवा एमआरएसएएम, मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून आकाशात मारा करणारे  क्षेपणास्त्र अशा शस्त्रास्त्रांची निर्मिती करते.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा घालून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प केव्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता आहे.

बडनेरातील पाचबंगला परिसरातील उत्तमसरा मार्गावर १९६ एकर जमिनीवर हा वॅगन दुरुस्ती कारखाना उभारला जात आहे. कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

या प्रकल्पाशेजारी प्रशस्त इमारत, २०० निवासस्थाने आणि कारखान्याचे शेड उभारले जाणार आहेत. पाटणा येथील रेल्वे बांधकाम विभागावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपविली आहे. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते कंत्राटदार नेमून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासह विविध बाबी पाटणा रेल्वे बांधकाम विभागाला पूर्ण कराव्या लागणार आहेत.

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची अचलपूर येथील फिनले मिल गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. करोनाकाळात एनटीसीच्या देशभरातील एकूण २३ मिलपैकी नफ्यात आणि तांत्रिकदृष्टय़ा सुसज्ज असलेल्या मिल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात फिनले मिलचा समावेश असल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. पण तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत. फिनले मिल पूर्वरत सुरू करण्याबाबत नुकतेच राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन दिले. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून लवकरच दिल्लीमध्ये  बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पवार यांनी दिले. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अमरावतीकरांची मागणी आहे.

रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम संथ

बडनेरा रेल्वे स्थानकानजीक उभारण्यात येत असलेल्या वॅगन दुरुस्ती कारखान्याचे कामही संथ गतीने सुरू आहे. या कारखान्यासाठी करोनाकाळातही ८० कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याचा दावा करीत खासदार नवनीत राणा यांनी या प्रकल्पाचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असे सांगितले होते. पण अजूनही या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडलेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Even after a decade the project in amravati is still stalled zws

ताज्या बातम्या