“फडणवीसजी, या दोन साध्या प्रश्नांची उत्तरं द्या”; काँग्रेसचा सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा मराष्ट्रातील भाजपा नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न

sachin sawant devendra fadnavis

देशात करोनावरील लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून राजकारण चांगलंच तापलं आहे. बिगरभाजपा सरकार असणाऱ्या राज्यांना लसीचा कमी पुरवठा करण्यात येत असल्याचं विरोधाकांचं म्हणणे आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लस पुरवठा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही लसीवरून मोठं राजकारण सुरु आहे. राज्याचा लसीकरणात सर्वात पुढे क्रमांक असला तरी अद्याप अनेकांना लस मिळालेली नाही. त्यावर राज्य सरकार केंद्राकडे वारंवार लसीसाठी विनंती करत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे राज्यात १० ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आलं आहे. केंद्राकडून जास्त पुरवठा झाल्याचं राज्यातील भाजपा नेत्यांचं म्हणणे आहे. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रात लसींच्या वापरात अपव्यय झाल्याचे म्हटले होते. त्यावर राज्य सरकारने हे सत्य नसल्याचे म्हटले होते.

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून राज्याला सर्वात जास्त लस पुरवठा करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील रुग्ण संख्येचा दाखला देत सावंत यांनी महाराष्ट्राला कमी लसी का असा सवाल केला आहे.

“भाजपा महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन साधेसोपे प्रश्न. जर महाराष्ट्राच्या १३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर गुजरात च्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का? १९ मे केंद्रीय आरोग्य विभागानुसार महाराष्ट्रात ४,०४,२२९ तर गुजरातमध्ये ९२,६१७ अॅक्टीव रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ४९,७८,३३७ जणांना तर गुजरातमध्ये ६,६९,४९० जणांना करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात ८४,३७१ तर गुजरातमध्ये ९,३४० एकूण मृत्यू झाले आहेत तरीही महाराष्ट्राला २ कोटी लसी व गुजरातला १.६२ कोटी लसी का? फडणवीस जी उत्तर द्या,” असा सवाल सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये पीआयबीने राज्यांना पुरवठा केलेली लसींची आकडेवारी दिली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाने करोना रुग्णांची आकडेवारी देखील आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. सावंत यांनी गुजरातची लोकसंख्या कमी असताना देखील त्यांना जास्त लसी दिल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्राच्या बाबतीत हा भेदवाव का असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fadnavisji answer these two simple questions congress sachin sawant question abn

ताज्या बातम्या