सातारा : नांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकऱ्याच्या १३ गायींचा मागील आठ दिवसांत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तो अहवाल आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
शेतकरी अजिज महमद शेख यांचा नांदवळ येथे जनावरांचा गोठा आहे. त्यांच्याकडे २९ जनावरे आहेत. २५ जूनपासून अचानक गायींंची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांनी तत्काळ खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत उपचार सुरू केले. मात्र, ८ दिवसांत १३ गायींचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, पुणे येथील प्रयोगशाळेचे सहअधीक्षक डॉ. हलसुरे, उपायुक्त डॉ. लहाने, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भिसे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली.
गायींचे शवविच्छेदन करून नमुने पुणे येथील रोगअन्वेषण प्रयोगशाळा व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. संबंधित गोठ्यातील अन्य जनावरांवरही औषधोपचार केले आहेत. गावातील सुमारे ५०६ जनावरांना दोन पथकांमार्फत लसीकरण केले आहे. गावात पशुसंवर्धन विभागाचे पथक तैनात आहे.