रत्नागिरी : पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येवून सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासना कडून घेण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता. मात्र आता २१ ऑक्टोबर पासून पुन्हा या कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी कोकण रेल्वेवर प्रवाशांसाठी सर्वसाधारण वेळापत्रक लागू होणार आहे.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आणि मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्यांचा वेग नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. यावर्षी रोहा – ठाकूर दरम्यानच्या ७३९ किमी पट्ट्यावर पावसाळी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. येथील धोकादायक दरडी काढून टाकण्यात आल्या आहे. आपत्कालीन मदतीसाठी ठराविक अंतरावर अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व सिग्नल यंत्रणेत एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

पावसाळ्यामध्ये वीर – उडुपी ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली, तर उर्वरित मार्गावर सामान्य वेगमर्यादा राहणार आहे. रोहा – वीर दरम्यान ४७ किमी अंतरावर ताशी १२० किमी, वीर – कणकवली २६९ किमी अंतरावर ७५ ते १२० किमी, कणकवली – उडुपी ३७७ किमी अंतरावर ९० ते १२० किमी, तर उडुपी – ठोकूर ४७ किमी अंतरावर ताशी १२० किमी वेगमर्यादा आहे.

दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई – कोकण मार्गावर जलद, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस, एलटीटी – करमळी एक्स्प्रेस, दादर टर्मिनस – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, तसेच सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस यांचा समावेश आहे, जे नियमित वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.