कराड : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात ‘इस्कॉन’तर्फे कराड शहरात प्रथमच आयोजिलेल्या जगन्नाथ रथयात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना ही रथयात्रा उत्साहात झाली. रथ ओढताना ‘हरे कृष्ण, हरे राम’ च्या गजरात परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

ओडिशातील पुरी येथे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर कराड शहरातून ही रथयात्रा काढण्यात आली. त्यास कराडकर नागरिक, भाविक अन् भक्तगणांनी प्रतिसाद दिला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे-गुरुजी यांनीही उपस्थित राहून भगवान जगन्नाथाच्या चरणी अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीने रथयात्रेला अधिक धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची सुंदर आणि सजवलेली मूर्ती रथात विराजमान करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने रथ ओढण्याचा मान मिळवण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. रथयात्रेला शिवतीर्थ दत्त चौकातून सुरुवात झाली. नंतर ही यात्रा भेदा चौक, कार्वे नाकामार्गे सिद्धार्थ मंगल कार्यालय, गोळेश्वर येथे पोहोचली. रथयात्रेत भाविकांसाठी विविध कीर्तन, भजन, ढोल-ताशांचे वादन, तसेच फुलांची सजावट आणि सांस्कृतिक साज पाहायला मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रथयात्रेनंतर येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात भागवत कथा, प्रवचन, गीता ज्ञान, तसेच प्रसाद वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी कथाकथन, कृष्णलीला यांचे सादरीकरण करण्यात आले होते. या रथयात्रेचे आयोजन कराडसारख्या शहरात प्रथमच झाल्याने लोकांमध्ये मोठा उत्साह व भक्तिमय वातावरण होते. अनेक भाविकांनी आपापल्या कुटुंबासह सहभागी होऊन या अनोख्या अध्यात्मिक अनुभवाचा लाभ घेतला.