सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटातील खूनाचे गूढ उकलण्यात सांगली पोलिसांना यश आले असून कर्नाटकातील विजयपूरच्या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शुक्रवारी दिली. विजयपूरच्या तरुणाचा अनैतिक संबंध आणि आर्थिक कारणातून खून झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नागज घाटामध्ये दि. १० फेब्रुवारी रोजी अज्ञाताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याचा चेहरा विद्रुप करण्याबरोबरच डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा – शिवसेनेच्या महाअधिवेशनास उत्साही वातावरणात सुरुवात; सहा ठराव संमत
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने या खुनाची उकल सहा दिवसांत करून संशयितांना गजाआड केले. या प्रकरणी कर्नाटकातील विजयपूरमधील मो. रफीक शब्बीर महंमदापूर (वय ३२), यासीन अन्वर बल्लारी (वय ३०), मोसीन अन्वर बल्लारी (वय २८) आणि अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावर्ची (वय २७, सर्व रा. ख्वॉजा मस्जिद, जेल दर्गा परिसर) या चार संशयितांना आज अटक करण्यात आली.
हेही वाचा – मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापुरात अमदारांच्या घरांसमोर आक्रोश
यातील मुख्य संशयित महंमदापूर यांने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ हसनसाब गनवार याला विजयपूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून व छातीवर चाकूने वार करून खून करण्यात आला. पार्थिव नागज घाटात मोटारीने आणून डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून आणि आर्थिक कारणातून हा खून साथीदारकडून केला असल्याची कबुलीही संशयितांने पोलिसांना दिली आहे.