जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार सुरेश जैन यांच्यासह राजा मयूर व जगन्नाथ वाणी या संशयितांनी सादर केलेल्या रजेच्या विनंती अर्जाला विशेष न्यायालयाने शनिवारी सशर्त परवानगी दिली. दिवाळी सणाच्या पूजेसाठी त्यांनी न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुरेश जैन व जगन्नाथ वाणी यांना धुळे शहर न सोडता त्यांच्या धुळेस्थित घरातच पूजा करण्याला परवानगी देण्यात आली. या काळात दररोज सकाळी साडेआठला कारागृहाबाहेर पोलिसांसोबत जैन व वाणी हे आपापल्या घराकडे रवाना होतील आणि सायंकाळी साडेआठ वाजता ते स्वत: पोलिसांसोबत कारागृहात परततील, अशी अट विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी ही परवानगी देताना घातली आहे. संशयितांपैकी सुरेश जैन व जगन्नाथ वाणी यांनी जळगाव येथे पूजेसाठी जाण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज केला होता.

मात्र, दोघांना जळगावला जाण्यास परवानगी नाकारली आणि धुळे न सोडण्याची अट न्यायालयाने घातली आहे. या प्रकरणातील तक्रारदार प्रवीण गेडाम हे न्यायालयात उपस्थित नव्हते. यामुळे खटल्याचे पुढील कामकाज १७ किंवा १८ नोव्हेंबरला होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.