health department tukaram mundhe surprise visit to hospitals | Loksatta

डॉक्टरांनो, रुग्णालयातून गायब होऊ नका; आरोग्य विभागाची रात्रीच्या वेळी धडक तपासणी मोहीम!

रात्रीच्या वेळी कामावरील डॉक्टर हजर असतात का हे तपासण्यासाठी ही राज्यव्यापी मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली.

डॉक्टरांनो, रुग्णालयातून गायब होऊ नका; आरोग्य विभागाची रात्रीच्या वेळी धडक तपासणी मोहीम!
आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशांनुसार तपासणी!

संदीप आचार्य

गडचिरोलीच्या ग्रामीण रुग्णालयापासून ठाण्यातील ग्रामीण रुग्णालय ते प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी तपासणी मोहीम राबवली. रात्रीच्या वेळी कामावरील डॉक्टर हजर असतात का हे तपासण्यासाठी ही राज्यव्यापी मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली होती. चांगली गोष्ट म्हणजे या मोहिमेत बहुतेक सर्व ठिकाणी डॉक्टर उपस्थित असल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

रात्रीच्या वेळेतील डॉक्टर आरोग्य केंद्रात वा रुग्णालयात हजर असलाच पाहिजे, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना अखंड उपचार मिळावे या भूमिकेतून आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या तपासणीचे आदेश जारी केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकार् यांपासून संपूर्ण यंत्रणा गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागातील ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन कामावरील डॉक्टर जागेवर उपस्थित आहेत का याची तपासणी करत होते. महत्वाचे म्हणजे या सर्वांचे व्हिडिओ चित्रण व फोटो काढण्यास सांगण्यात आल्याने चौकशी करणारे डॉक्टरही प्रत्यक्षात जागेवर गेले होते व कोणत्या वेळी गेले तेही स्पष्ट झाले.

याबाबत आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना विचारले असता, आरोग्य सेवा चोवीस तास मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर जागेवर उपस्थित राहातात का हे तपासणे गरजेचे होते. डॉक्टर जर रात्रीच्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर असतील तरच रुग्णांना उपचार मिळणे शक्य आहे. अनेकदा शेतात काम करताना साप चावतात. विंचू दंश वा गर्भवती महिलांचे प्रश्न असतील किंवा रात्री काही दुर्घटना घडली तर संबंधित डॉक्टर हा रुग्णालयात वा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच ही अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आल्याचे मुंडे म्हणाले. अशी अचानक तपासणी यापुढेही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वा ज्या ठिकाणी निवासी डॉक्टर व परिचारिका उपस्थित असणे आवश्यक आहे तेथे त्यांची राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छतागृहांची परिस्थिती काय आहे याचाही आढावा घेऊन योग्य त्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातील असे तुकाराम मुंडे यांनी सांगितले.

जवळपास ६० आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात आली असून यात तेरा डॉक्टर कामावर उपस्थित नसल्याचे आढळून आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या तपासणी मोहीमेच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांनी दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी डॉक्टरांना राहाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे सांगितले. स्वच्छतागृहांची बहुतेक ठिकाणी बोंब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कुठे स्वच्छता गृहाला दार नाही तर कुठे कडी नाही. काही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही तर पावसाळ्यात अनेक निवासी ठिकाणी गळती लागलेली असते. आम्ही डॉक्टर आहोत, जनावरे नाही की गोठ्यात बांधून ठेवले अशा प्रतिक्रिया काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

आम्ही आजही आहे त्या परिस्थितीत निवासी डॉक्टर म्हणून काम करतो मात्र तुकाराम मुंडे यांनी राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या ठिकाणी तसेच अगदी जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणांसह जेथे डॉक्टर चोवीस तास हजर असणे अपेक्षित आहे तेथे डॉक्टर व परिचारिकांच्या निवासची तसेच स्वच्छतागृहांची काय व्यवस्था आहे याची माहिती घ्यावी. जेथे निवासाची व स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसेल तेथे ती तात्काळ उपल्ब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे अशी अपेक्षाही या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागात हजारोंनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याचा ताण घेऊन करोना काळात दिवसरात्र डॉक्टरांनी काम केले आहे. ग्रामीण रुग्णालयात सहा परिचारिका व तीन डॉक्टर एवढ्या तुटपुंज्या मनुष्यबळात काम करावे लागते. यातील कोणी रजेवर गेले वा आजारी पडले तर अनेकदा हक्काची सुट्टीही घेता येत नाही. प्राथमिक केंद्रांसह सर्वत्र औषधे पुरेशा प्रमाणात आहेत की नाही व डॉक्टरांना योग्य सुविधा मिळतात का, याचीही उच्चपदस्थ सनदी अधिकार्यांनी एकदा पाहाणी करावी असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांपासून मॅग्मोपर्यंत डॉक्टरांच्या अनेक संघटना आहेत मात्र दुर्दैवाने या संघटना प्राथमिक आरोग्य केंद्र वा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रश्नावर कधीच आवाज उठवत नाहीत की पाठीशी उभ्या राहातात. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंडे यांनीच हा प्रश्न लक्ष घालून सोडवावा, अशी अपेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले…

संबंधित बातम्या

“या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा
शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले, “तो व्हिडीओ…”
“राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले, “अधिवेशनापूर्वी…”
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘समृद्धी महामार्गावरून’ एकत्र प्रवास केलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप; म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर
Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…
“Mother Of The Year”: रॅकून प्राण्याचा मुलीवर हल्ला, लेकीला वाचवण्यासाठी आईने असं काही केलं…; 15 million व्यूज मिळालेला Viral Video पाहतच राहाल
“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट
टूथब्रश किती दिवसानंतर बदलावा? टूथब्रश ठेवण्याच्या जागेचाही होतो आरोग्यावर परिणाम? जाणून घ्या