सांगली : उत्तरा नक्षत्राच्या पावसाने गुरुवारी जत तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. माडग्याळ १३३ मिमी, तर तिकोंडी मंडळात ८२.३ मिमी पावसाची नोंद झाली.
बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने करजगी येथील एक वृद्ध पुलावरून पडल्याने मृत झाला. पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३० क्युसेक विसर्ग शुक्रवारपासून करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा-वारणा नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
जत तालुक्यातील माडग्याळ व तिकोंडी मंडळात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला असून, एका रात्रीत माडग्याळ मंडळात १३३ मिमी, तर तिकोंडी मंडळात ८२.३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे शेकडो एकर जमिनीवरील पिकामध्ये पाणी साचले असून, काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेली आहेत. ताली फुटून ओढे, नाले यांना पूर आला.
माडग्याळ, उटगी, व्हसपेठ, गुड्डापूर, दरीबडची, संख, कुलाळवाडी, अंकलगी आदी गावांत रात्री झालेल्या पावसाने रानात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत, तर रब्बी हंगामासाठी सोडलेल्या रानातही पावसाने दैना केली आहे. मका, कांदा, डाळिंब या पिकांचेही या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. संख येथे बोर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. करजगी-बोर्गी या मार्गावर पुलावर पाणी आले असून, या पाण्यातून जात असताना इराप्पा चनबसू अक्कलकोट (वय ६५) हा पाय घसरून पात्रात पडल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पश्चिम घाटातील कोयना, धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी, चांदोली, तुळसी व पाटगाव ही नऊ धरणे काठोकाठ भरली आहेत. तर, राधानगरी, कासारी या धरणांत ९९ टक्के आणि दूधगंगा धरणात ८५ टक्के पाणीसाठा शुक्रवारी सकाळी झाला होता. कोयनेमधून पायथा विद्युतगृहातून २१००, तर चांदोलीच्या वक्र दरवाजातून ४ हजार आणि विद्युतगृहातून १६३० असा ५६३० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नदीतील पाणीपातळीत वाढ होणार असून, नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी दिला.