अलिबाग: मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर पट्ट्यातील रुंदीकरणाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. देखभाल दुरुस्ती आभावी महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना खड्यांत आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. या प्रश्नाकडे लक्षवेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकार आणि सामाजिक संघटनांनी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन केले.

सकाळी साडेदहा वाजेपासून या आंदोलनाला सनदशीर मार्गाने सुरवात झाली. जिल्ह्यातील साडे तीनशे पत्रकार यात सहभागी झाले होते. विवीध सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला. आमदार अनिकेत तटकरे यांनीही आंदोलनाला पाठींबा देत आपला सहभाग नोंदविला. अकरा वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे राहून मानवी साखळी करून आंदोलन सुरु होते. यावेळी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरवात करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा : संजय राऊतांना जामीन मंजूर; दीपक केसरकरांनी दिल्या सदिच्छा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत व्होटकर आणि रोहा तहसिलदार कविता जाधव कोलाड नाका येथे दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. खड्डे बुजविण्याचे काम पंधरा दिवसात पुर्ण केले जाईल आणि काँक्रीटीकरणाचे काम महिन्याभरात सुरु केले जाईल अशी ग्वाही आंदोलन करत्यांना दिली. रस्त्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी रायगड प्रेस कल्बच्या वतीने करण्यात आली. तर आमदार अनिकेत तटकरे यांनी भुसंपादनाच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधले. आज सनदशीर मार्गाने आम्ही आंदोलन केले आहे. महिन्याभरात रस्त्याची दुरुस्ती पुर्ण झाली नाही आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरु झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी यावेळी दिला. महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कोलाड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.