महेश मांजरेकर काँग्रेस मध्ये आले तर आनंदच – अशोक चव्हाण

महेश मांजरेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये आले तर आनंदच होईल अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. कोल्हापुरात आज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या दोघांनीही सोबत ब्रेकफास्ट केला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर हे कॉलेजपासूनचे स्नेही आहेत. अशोक चव्हाण यांची भेट महेश मांजरेकरांनी घेतल्यामुळे मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. याबाबत अशोक चव्हाण यांना विचारले असता महेश मांजरेकर जर काँग्रेसमध्ये आले तर आनंदच होईल अशी सूचक प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

महेश मांजेरकर हे पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा साकारत आहेत. यासंदर्भातल्या शूटिंगसाठी ते कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत. कारण सरकारविरोधातली जनसंघर्ष यात्रा सध्या कोल्हापुरात आहे. महेश मांजरेकर यांना ही गोष्ट समजल्यावर ते अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले. या दोघांमध्ये बराच वेळ अनौपचारिक गप्पा झाल्या. महेश मांजरेकरांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम केला. त्यानंतर ते कुठे जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. ते काँग्रेसमध्येच जातील अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

या पार्श्वभूमीवर आज महेश मांजरेकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा रंगली. मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र महेश मांजरेकर हे स्टार अभिनेते आहेत ते जर काँग्रेसमध्ये आले तर तुम्हाला आवडेल का? असे विचारले असता, महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे असे सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे. आता महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार का? हे त्यांनी निर्णय घेतल्यावर समजलेच. मात्र तूर्तास तरी अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर यांच्या भेटीची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे. याबाबत महेश मांजरेकर यांची काही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: If mahesh manjrekar join congress it will be pleasure for us says ashok chavan