सांगली : बनावटगिरी करून सरकारी नोकरी केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना विटा पोलीसांनी बनावट दाखले देणार्‍या टोळीचा छडा लावला असून या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे कागद, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, शिक्के असा ऐवज जप्त केला आहे. यापुर्वीही या टोळीवर बनावटगिरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. नेवरी (ता. खानापूर) येथे डाकपाल म्हणून नियुक्ती झालेल्या प्रमोद आमणे याच्या कागदपत्राची पडताळणी करत असताना त्याने दिलेले दहावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीत आढळून आले. यामुळे या प्रकरणी आमणे याच्याविरूध्द विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांना अजित पवार गटाच आव्हान; मुंब्रा-कळवा विधानसभेबाबत नजीब मुल्ला यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी तपास करत असताना विटा पोलीसांना या बनावटगिरीचा सुगावा लागला. या प्रकरणी आमणे याच्यासह शिवाजी यमगर, काकासाहेब लोखंडे, रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे, गजानन गावडे, महेश चव्हाण या सात जणांना अटक केली आहे. यमगर, व लोखंडे यांनी आमणे यास गावडे बंधूकडून बनावट प्रमाणपत्र मिळवून दिले होते. या दोघाकडे पोलीसांनी चौकशी केली असता शिगाव (ता. वाळवा) येथील गावडे बंधूच्या या कारनाम्याची माहिती मिळाली. आमणे यास 1 लाख ३५ हजार रूपये घेउन बनावट दाखला देण्यात आला होता. या गावडे बंधूनी आणखी कोणा-कोणाला अशी बनावट दाखले , कागदपत्रे बनवून दिली होती का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.