सोलापूर : जुनी वापरात असलेली मोटार खरेदीसाठी पसंत करून त्यापैकी एक लाख रूपये अनामत रक्कम दिली आणि विश्वास संपादन करून मोटार नेऊन उर्वरीत तीन लाख रूपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे व त्यांच्या साथीदारांविरूद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मनीष काळे यांच्यासह आकाश मुदगल अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. विठ्ठल दत्तात्रेय मुनगापाटील (वय ३९, रा. सृष्टीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पवार कुटुंबीय अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत? जय पवार म्हणाले, “परिवारात प्रत्येकजण…”

विठ्ठल मुनगापाटील यांचा जुन्या चारचाकी मोटारींची विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातून जुनी वाहने खरेदी करून त्यांची विक्री ते सोलापुरात करीत असतात. गेल्या ४ जानेवारी रोजी मुनगापाटील यांच्या घरी त्यांच्या ओळखीचा आकाश मुदगल आला. त्याने मनीष काळजे यांना जुनी चारचाकी मोटार खरेदी करायची असल्याचे सांगितले. तेव्हा मुनगापाटील यांनी त्यांच्या ताब्यात असलेली मोटार (एमएच ०४ एफएन ७८७८) विक्रीसाठी दाखविली असता मनीष काळजे यांनी पसंत केली. मोटारीचा सौदा चार लाख रूपयांत ठरला. काळजे यांनी एक लाख रूपयांची आगाऊ रक्कम दिली. उर्वरीत तीन लाख रूपये देण्यापूर्वीच मुनगापाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांनी मोटार ताब्यात घेऊन वापरण्यासाठी नेली. परंतु खरेदीचे तीन लाख रूपये येणे असलेली रक्कम मागितली असता मनीष काळजे व आकाश मुदगल यांनी मुनगापाटील यांना रक्कम न देता किंवा मोटार परत न करता दमदाटी आणि शिवीगाळ करून हुसकावून लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनीष काळजे यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आपणांस बोलावून चौकशी केली नाही. पडताळणी न करताच आपल्यावर गुन्हा दाखल करताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पूर्वीच्या वादाचा राग काढल्याचा आरोप काळजे यांनी केला आहे.