येत्या १७ ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानभवनात विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा – कर्नाटकमध्ये प्रेम प्रकरणातून धार्मिक हिंसाचार; दोघांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र, महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्रसरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते, अशी टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली. तसेच सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचीही नाराजी, जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने कोणतीही…”

जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या ४० दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गोगलगायींचे आक्रमण वाढले आहे, मात्र सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.