Jayant Patil on NCP-SP Party State President : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट आज (१० जून) त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांचे पुण्यात मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मेळावा चालू असून या मेळाव्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. तसेच आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असंही नमूद केलं.

जयंत पाटील म्हणाले, “मला शरद पवार यांनी अनेक संधी दिल्या आहेत. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी तुमच्या सर्वांसमोर शरद पवार यांना एवढीच विनंती करेन… शेवटी हा पक्ष शरद पवारांचा आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत निर्णय घेतील. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. आजवर मिळालेल्या संधीसाठी मी शरद पवारांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो”.

जयंत पाटील सात वर्षांपासून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर आहेत

जयंत पाटील यांच्या या विनंतीनंतर आता ते प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास सुचवलं आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार व आमदारांच्या उपस्थितीत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. पक्षातील एक अनुभवी व संयमी चेहरा आता या पदावरून पायउतार होऊ पाहतोय, अशा स्थितीत शरद पवार नेमका काय निर्णय घेणार, ते आता पक्षाची जबाबादारी कोणत्या नेत्याकडे सोपवणार असा प्रश्न सर्वंना पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…रणात झुंजणारे आहेत काही”

शरद पवार यांना विनंती करण्यापूर्वी जयंत पाटील पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत म्हणाले, “एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे देशात केवळ दोनच खासदार होते. आता तोच पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नका. आपण सर्वजण ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा एकदा जिंकू शकतो. करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही”.