Ganeshotsav 2025: कराड : गणेशोत्सवानिमित्त कराड नगरपालिकेने गणपतीमुर्त्यांच्या विसर्जनासाठी सर्वंकष नियोजन केले आहे. भक्तांना सोयीस्कर व सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच गणपतीमुर्त्यांचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे, यासाठी कराड नगरपालिका, पोलीस दल, शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे.
कराड शहरातील मुख्य चौकांसह विविध ठिकाणी तब्बल ४२ कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जनावेळी कृष्ण, कोयना या प्रमुख नद्या व त्यावरील जलस्त्रोत प्रदूषित होऊ नयेत, यासाठी निर्माल्य संकलनासाठी जागोजागी खास कलशांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भक्तांनी घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन याच कृत्रिम जलकुंडात करावे, असे आग्रही आवाहन कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.
कृष्णा नदीकाठच्या वाळवंटाचे सपाटीकरण करून विसर्जनासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रात्री उशिरा होणाऱ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दोन मोठे प्रकाश झोताचे मनोरे (लाईट टॉवर) उभारण्यात आले असून, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे नदीपत्रात खोलवर विसर्जन करण्यासाठी तराफ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच विसर्जनानंतर गणेश मंडळांच्या वाहनांना बाहेर पडण्यासाठी कृष्णा नदीवरून लाहोटी कन्याशाळेकडे जाणारा पर्यायी रस्ता म्हणून तयार केला आहे.
विसर्जनावेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त नियोजन केले आहे. मिरवणुकीचे सर्व मार्ग स्वच्छ व सुकर करण्यात आले आहेत. ग्रामदेवता कृष्णामाई मंदिरासमोर विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून, कृत्रिम जलकुंडात घरगुती गणपती विसर्जन करणाऱ्या भाविकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्ती संकलन वाहने शहरात फिरून घरगुती गणेशमूर्ती गणेशभक्तांच्या इच्छेनुसार संकलित करणार आहेत.
शहरभर कृत्रिम जलकुंड
कृष्णा- कोयना नद्यांचा प्रीतिसंगम, कृष्णा घाट, स्वामीची बाग परिसरासह प्रकाशनगर, रुक्मिणीनगर, कृष्णा नाका, कन्या शाळा, कमळेश्वर, गवळवेश घाट, शिवाजी हौसिंग सोसायटी, दत्त चौक, शाहू चौक, शिक्षक कॉलनी, कोयनेश्वर, पी. डी. पाटील गार्डन, विवेकानंदनगर, कोल्हापूर नाका, भेदा चौक, कुंभार पाणवठा, मार्केट यार्ड आदी ठिकाणी कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्यात आली आहे.
मगर, सापांपासून काळजी घ्यावी
सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात येणार आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे नदीपात्रात पाणी वाढले असून, नदीपात्रात मगर आणि सापांचाही वावर असल्याने नागरिकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपालिकेसह सामाजिक संस्था नदीकाठावर असणार आहेत. मात्र, नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये. तसेच नदीकाठावर प्रथमोपचार पेटी, रुग्णवाहिकेची सोय, कृत्रिम तळ्यांशेजारीच निर्माल्यकलशही असणार आहेत.