सोलापूर : पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात आणि प्रदूषण करण्यास सर्वाधिक जबाबदार मनुष्यच आहे. मानवनिर्मित प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्याच हाती आहे. प्रत्येकाने आपल्या घरात आणि समाजात दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये प्लॅस्टिक आणि पर्यावरणाला घातक असणारे घटक हद्दपार करावेत, अशी अपेक्षा महावितरणचे निवृत्त मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी व्यक्त केली.

वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण आणि तज्ज्ञांकडून मिळालेल्या पर्यावरणीय संदेशाने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप कुमठे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनमध्ये झाला. प्रारंभी तंत्रनिकेतनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक हृषीकेश कुलकर्णी उपस्थित होते.

या प्रसंगी छायाचित्रकार रामदास काटकर आणि पर्यावरण कार्यकर्ते प्रवीण तळे यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल मिलिंद माईणकर यांनाही सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ तंत्रनिकेतनच्या प्राचार्या रोहिणी चव्हाण, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे अधिकारी अमित राठोड, अनंत जाधव आदींची उपस्थिती होती.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पर्यावरण संवर्धनातील योगदान मोठे आहे. या कार्याचे रूपांतर आता चळवळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालयांसह समाजात जाऊन पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून होत असल्याबद्दल जयकुमार माने यांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीरेंद्र चित्राव यांनी प्रत्येक महाविद्यालयात पर्यावरण रक्षण समितीची स्थापना व्हावी, यातून पर्यावरणरक्षण आणि संवर्धन मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल, अशी सूचना केली. किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजकडून या समित्यांना उत्तम कार्यक्रम दिले जातील. प्लॅस्टिकमुक्ती, कापडी पिशवी कार्यशाळा, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पर्यावरण ग्रंथालय असे अनेक उपक्रम या माध्यमातून होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.