कोल्हापूर : दिवसभर मुसळधार पाऊस असतानाही आजरा येथे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवानंतर शक्तिपीठ विरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दिला.
आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेला मोर्चा आजरा शहरातील शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालया पर्यंत निघाला. माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, विजय देवणे, संपत देसाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
गेल्या चार दिवसापासून आजरा शहरासह तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या परिस्थितीतही शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने शक्तिपीठ विरोधात मोर्चाची हात दिली होती. मुसळधार पावसामुळे मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळणार असे वातावरण होते. तथापि या आंदोलनाला शेतकरी नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. शेती कामासाठी वापरण्यात येणार इरले डोक्यावर घेऊन महिलाही सहभागी झाल्या होत्या. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा आजरा तहसील कार्यालया जवळ आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, यापूर्वीही अनेक प्रकल्प झाले आहेत त्या प्रकल्पांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याची लढाई झाली, आता शेतीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याचे आमिषाला बळी पडू नये. शेतीमुळे समाजात आपण ताठ मानेने उभे आहोत. गणेशोत्सवानंतर शक्तिपीठ विरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल. हजारो एकर शेती उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेती काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात ताकतीने सर्वजण एकसंघ राहू या.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही. केवळ जमिनी जाणाऱ्यांना नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसणार आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शक्तिपीठामुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला महापुराचा फटका बसणार आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन करून बॉक्साइड तस्करी करण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का? अदानींनी गडचिरोलीत अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे, हे खनिज वाहतुकीसाठी शक्तीपीठाचा अट्टा सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान देऊन ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनात सरकारने जमा केलेले सातबारा हे बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. संपत देसाई म्हणाले, शेतकऱ्यांचा शक्तिपीठाला विरोध आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे शक्तिपीठ चंदगड तालुक्यात नेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करत आहेत. शक्तिपीठ विरोधी आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे. या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातून विरोध सुरू आहे.
संजय तर्डेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक गावांचे विभाजन होणार आहे. भागाच्या विकासासाठी रेल्वे मार्गांचे जाळे व्हावे. तानाजी देसाई म्हणाले, शेती उध्वस्त झाली तर लोकांनी जगायचे कसे? शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सर्वांनी हाणून पाडावे. राजेंद्र गड्डयान्नावर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे स्वप्न साऱ्यांनी मिळून धुळीस मिळवूया. राहुल देसाई म्हणाले, आम्ही विकासाच्या आड नाही मात्र शेतकऱ्यांच्या उरावर बसून विकास नको.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, आम्हाला शक्तिपीठ नको तर कर्जमाफी द्या. यावेळी कॉ. सम्राट मोरे, शिवाजी गुरव, अमर चव्हाण कॉ. अतुल दिघे, संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मुकुंद देसाई, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळ पाटील, सत्यजित जाधव, दिग्विजय कुराडे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, शामराव देसाई, प्रकाश वास्कर, रियाज शमनजी, प्रभाकर कोरे, रवींद्र भाटले, संजय सावंत, नौशाद बुड्ढेखान, प्रभाकर खांडेकर, सुभाष देसाई, रणजीत देसाई, विक्रम देसाई, अनिल फडके, अल्बर्ट डिसूजा, धनाजी राणे, सचिन घोरपडे, कॉ. संजय घाटगे, राजू होलम, शांताराम पाटील, किरण कांबळे, संकेत सावंत, उत्तम देसाई, आरिफ खेडेकर, निवृत्ती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.