कोल्हापूर : नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीला परत द्यावे, या मागणीसाठी सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
नांदणी येथील मठातील महादेवी हत्ती गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आला आहे. त्या विरोधात तीव्र जनभावना निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये लढे सुरू झाले आहेत.
भगवान महावीर उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हत्ती परत मिळण्याचा लढा हा फक्त जैन समाजापुरता न राहता तो सकल मानवाचा बनला असल्याचे सांगितले. आमदार राहुल आवाडे म्हणाले, की महादेवी हत्तीबाबत पेटा प्राणिमित्र संघटना आणि वनताराच्या अधिकाऱ्यांनी केलेले कारस्थान अत्यंत निंदनीय आहे. तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा झाली आहे.
अंबानीविरोधात रोष
अंबानी समूहाच्या वनतारा प्रकल्पामध्ये हत्ती नेल्यानंतर या समूहाच्या विविध उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकलढ्यातील हे सगळ्यांत मोठे आंदोलन यशस्वी होत असून, आतापर्यंत २० हजारांवर लोकांनी जिओचा मोबाइल पोर्ट केल्याचा दावा विविध वक्त्यांनी भाषणात केला. बैठकीनंतर मुख्य मार्गावर मूक मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली.
आमदारांनी मोबाइल नंबर बदलला
हत्ती परत आणण्यासाठी अंबानी समूहाच्या जिओचे मोबाइल नंबर बदलून बहिष्कार मोहीम राबवली जात आहे. आमदार राहुल आवाडे यांनीही आपल्याकडील जिओचा एक नंबर दुसऱ्या कंपनीत बदलत असल्याचे सांगितले. दरम्यान नांदणी येथील मठातील महादेवी हत्ती गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आला आहे. त्या विरोधात तीव्र जनभावना निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये लढे सुरू झाले आहेत. इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर शुक्रवारी सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळांकडून याचसाठी मूक मोर्चा काढण्यात आला.