सातारा : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य व कार्यक्षमतेला चालना देणाऱ्या २० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने होण्यासाठी पोलिसांच्या कामकाजात समन्वय राखला जावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा व एकूण पोलीस दलाचे काम प्रभावीपणे होऊन नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी दरवर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. यामध्ये फॉरेन्सिक सायन्स, घटनास्थळाची पाहणी, कायद्याबाबतचे ज्ञान, पोलीस व्हिडीओग्राफी, डॉग स्कॉडचा उपयोग, वाहन तपासणी, मनुष्य शोध, वस्तू शोधणे अशा तपासासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांची स्पर्धा घेण्यात येते.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, ‘या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर आपले पोलीस अधिकारी व कर्मचारी राज्यासाठी प्रतिनिधीत्व करतील. तसेच पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देतील. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपअधीक्षक (मुख्यालय) अतुल सबनीस, पद्मा कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पाच जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेतून विजेता संघ निवडला जाणार

कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही स्पर्धा यंदा साताऱ्यात होत आहे. त्यासाठी पाच जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी व कर्मचारी साताऱ्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारपासून प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात झाली आहे. दि. ८ खेळाडूंमधून कोल्हापूर परिक्षेत्राचा संघ निवडण्यात येणार आहे, तसेच विजेत्यांना बक्षीस वितरणही होणार आहे.