सातारा: मायभूमीत मेलो तरी चालेल, पण आता येथून माघार घेणार नाही, असा इशारा कोयना प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ठिकाणी चुली पेटवून या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा संसार थाटला आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा अशा ७ प्रकल्पग्रस्त गावातील ग्रामस्थ पुन्हा त्यांच्या मूळ गावी दाखल झाले आहेत. जंगलातील संवेदनशील क्षेत्रात त्यांनी आश्रय घेतला आहे. जावली व महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांचे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात पुनर्वसन झाले होते. त्या ठिकाणी त्यांना स्थानिकांशी संघर्ष करावा लागत असल्याने हे प्रकल्पग्रस्त पुन्हा त्यांच्या गावी परतले आहेत. महाबळेश्वर, जावली तालुक्यातील जंगलातच असलेल्या आपल्या मूळ गावठाणात त्यांनी आपला संसार पुन्हा थाटला आहे. त्यांच्या या पवित्ऱ्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव (ता. भिवंडी, जि. ठाणे) या ठिकाणी २०१५ साली पुनर्वसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरिता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यांपैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबेवगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. मात्र, गावातील स्थानिक आदिवासी नागरिक त्यांना त्रास देतात, स्थायिक होऊ देत नाहीत. मारहाण करतात. या त्रासाला कंटाळून, तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, वीज यासह अन्य सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावी जावली व महाबळेश्वर तालुक्यात परतण्याचे निश्चित केले.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता एकसळ सागाव (जि. ठाणे) येथून सुमारे ४० प्रकल्पग्रस्त आपल्या जावली या जन्मभूमीत आले. तेथून कुरोशी पुलावरून वाघावळे, उचाट, आकल्पे येथे पोहोचले. त्यानंतर आकल्पेतून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास आडोशी हे मूळ गाव त्यांनी गाठले. तेथील पडक्या, उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारतीसमोर संसार मांडून तेथे मांडून चूल पेटवली. घरे नाहीत, आडोसा नाही, वन्यप्राण्यांची भीती अशा वातावरणात सध्या हे प्रकल्पग्रस्त येथे ठाण मांडून बसले आहेत.

जावली, महाबळेश्वर याच मतदारसंघातील पुनर्वसन व मदत कार्यमंत्री मकरंद पाटील हे राज्यात नेतृत्व करतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावानजीकच भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.

मागण्यांवर ठाम

या वेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.