उद्योगांसाठी संपादित केलेल्या किंवा भूसंपादनाचे शिक्के असलेल्या कोकणातील जमिनी आता मोकळ्या होणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी जाहीर घोषणाच केली आहे.

अलिबाग येथे शुक्रवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्याात बोलताना सुभाष देसाई यांनी हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर नुसते शिक्के मारून अडकवून ठेवल्या. त्या जमिनी त्यांना विकता येत नाहीत . त्यावर कर्ज मिळत नाही, सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, कर्जमाफीचाही लाभ घेता येत नाही. मग या जमिनी मोकळ्या करण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्य़ातही अनेक जमिनी शासकीय तसेच खासगी उद्योगांसाठी संपादीत करून अडकून पडल्या आहेत.  जर जमिनींची गरजच नसेल तर त्या शासनाने अडकवून ठेवण्यात अर्थ नाही. ज्या जमिनी विनावापर पडून आहेत, ज्यांची उद्योगांना गरज नाही त्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील शिक्केउठवण्याचा निर्णय केला जाईल. असे देसाई यांनी यावेळी सांगितले.

उद्योगमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून मी हेच काम करतो आहे. ज्या जमिनी  विना अधिसूचित केल्या, मोकळ्या केल्या त्यावरून विरोधकांनी माझ्यावर आरोप सुरू केले. परंतु मी डगमगणार नाही, कारण मी जे करतो आहे ते लोकांच्या भल्याचे करतो आहे.

उद्योगांसाठी शेती किंवा बागायतींच्या जमिनी घ्यायच्या नाहीत. असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे हे पक्षाचे काम आहे. ते पूर्ण करणारच. असे सुभाष देसाई  यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, रवि मुंढे उपस्थित होते.