scorecardresearch

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधान परिषदेच्या १२ आमदारांचा देखील मुद्दा उपस्थित ; जाणून घ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांना काय दिली माहिती

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी परवानगी आणि राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज(शुक्रवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब, सतेज पाटील, जयंत पाटील, सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.

या भेटीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना या भेटीबाबत माहिती दिली. तर, या अधिवेशनात तरी विधानपरिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, मागील अधिवेशनातया मुद्य्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्या वाद पाहायला मिळाला होता.

लोकशाहीत बहुमताच्या सरकारचं महत्व असतं – एकनाथ शिंदे

माध्यमांशी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्यपाल महोदयांना विधानपरिषदेचे जे १२ आमदार आहेत, ते जे काही प्रकरण गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. त्यास मान्यता देण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. याचबरोबर विधासभेचं अध्यक्षपद याबाबत देखील परवानगी मिळावी. यासाठी देखीव आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यासाठी आम्ही मंत्री व सर्वजण त्यांना भेटलो. सकारात्मक चर्चा देखील झाली आणि सकारात्मक उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. लोकशाहीत बहुमताच्या सरकारचं महत्व असतं, त्याच्या निर्णयांना देखील महत्व असतं. राज्यपालांनी देखील या १२ आमदरांना लवकर न्याय देऊन, विधानपरिषदेच्या सभागृहात लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संधी द्यावी. त्यांना वंचित ठेवू नये अशाप्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे.”

आम्ही काही दबाव टाकत नाही आहोत – छगन भुजबळ

“राज्यपालांनी जी योग्य वाटेल ती तारीख त्यांनी द्यावी. आम्ही काही दबाव टाकत नाही आहोत. मात्र हा प्रश्न आता जवळपास वर्षभरापासून प्रलंबित आहे तो सोडवला गेला पाहिजे.”, असं आम्ही त्यांना सांगितलं. असं मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षाची निवड होऊच नये असा भाजपाचा प्रयत्न – नाना पटोले

तर “विधानसभा अध्यक्षाची निवड होऊच नये असा भाजपाचा प्रयत्न आहे. आज उच्च न्यायालयाने देखील त्यांना फटकरलं आहे. म्हणून विधानसभा अध्यक्षाची निवड तातडीने व्हावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज राज्यपालांकडे गेलो होतो. राज्यपल सकारात्मक आहेत आणि सकारात्मक निर्णय ते देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

महाविकास आघाडीकडून राज्यपालांना पत्र –

“आपणाकडील २४ जून २०२१ रोजीच्या पत्रान्वये आपण महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्षपद त्वरीत भरावे असे निर्देश दिलेले होते. त्यास अनुसरून डिसेंबर महिन्यात झालेल्या विधीमंडळ अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख निश्चित करून मिळण्याबाबत आपणास विनंती पत्र दिले होते. तथापी आपणाकडून अद्याप तारीख निश्चित करून देण्यात आलेली नाही.”

तसेच, “सद्यस्थितीत राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवड करण्याबाबत तारीख निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आपणाकडे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेला आहे. तरी कृपया प्रस्तुत प्रस्तावास मान्यता मिळावी ही नम्र विनंती.” असं पत्र राज्यपाल कोश्यारी यांना महाविकास आघाडीकडून देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leaders of mahavikas aghadi met the governor to elect the speaker of the assembly msr