महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची  यांची निवड झाली आहे. मोठ्या गदारोळात हे मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी निवडणूक मैदानात उतरले होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्त म्हणजे १६४ मते मिळाली आहेत.

विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला गिरीश महाजन यांनी त्याला अनुमोदन दिलं. महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिलं. भाजपाचे राहुल नार्वेकर विजय होतील असा विश्वास भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. तसेच १६५ ते १७० मते आमच्या आमदाराला मिळतील असेही मुनगंटीवार म्हणाले होते.

सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष

गेल्या वर्षी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधान सभा अध्यक्षपद रिक्त होते. तोपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपदाचा कामकाज पाहत होते. मात्र, आता नार्वेकरांची निवड झाल्यानंतर अध्यपदाचा कारभार त्यांच्या हातात सुपुर्त करण्यात आला. राहुल नार्वेकर आत्तापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनले आहे. ११ फेब्रुवारी १९७७ रोजी जन्मलेले नार्वेकर वयाच्या ४५ वर्षी विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत.

विधानमंडळावर सासरे-जावयाचं राज्य

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे विधान परिषदेत रामराजे निंबाळकरत तर विधानसभेत राहुल नार्वेकर अशी सासरे जावयाच राज्य विधानमंडळावर असणार आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल नार्वेकर यांनी शिवेसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत विधानपरिषदेत निवडून आले होते. तीन वर्ष ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या ते भाजपाचे आमदार आहेत. मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे ते आमदार आहेत. नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते.