मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. याचदरम्यान, जरांगे मंगळवारी (२१ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दाखल झाले. जरांगे पाटलांची ठाण्यात भव्य रॅली पार पडली. तसेच ठाण्यात त्यांची मोठी सभादेखील झाली. या सभेत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून आंदोलन बदनाम करू पाहणाऱ्यांवर टीका केली. तसेच अशा लोकांना सरकारचं पाठबळ आहे का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही लोकांना सातत्याने आवाहन करत आहोत. पोलीस बांधव रात्र-दिवस कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झटतात. आम्हीही आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी सर्व मराठ्यांना सतत संयमाने राहण्यास सांगत आहोत. तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. सोमवारी (२० नोव्हेंबर) रात्री कल्याणमध्ये तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले, मायनी, इस्लामपूर, सांगली, धाराशिव अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे की, हे आंदोलन रोखण्यासाठी तुम्ही काही लोकांना पुढे करताय असा अर्थ आम्ही काढायचा का? राज्यातली सुव्यवस्था बिघडावी असं तुम्हाला वाटतंय का? हा प्रश्न मला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे. तुम्ही ठरवून या लोकांना पुढे केलंय का? आम्ही मराठे शांतता राहावी यासाठी प्रयत्न करतोय. ओबीसी-मराठा वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. आंदोलनासाठी आम्हाला दिवस कमी पडतोय म्हणून आम्ही रात्रीदेखील लोकांच्या दारात जातोय.
काही लोक राजकीय स्वार्थापोटी राज्यात वाद निर्माण करत आहेत : मनोज जरांगे
मराठा आंदोलनकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तुम्ही पाठबळ देताय का? तुम्हाला जाती-जातीत तेढ निर्माण करून राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का? आम्ही काय चूक केलीय? आम्ही तर शांततेचं आवाहन केलं आहे. तरीदेखील काही लोक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, दंगलीची भाषा करत आहेत. आम्ही शांततेचं आवाहन करत आहोत. मराठे-ओबीसी भाऊ आहेत. परंतु, काही लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी राज्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. परंतु, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय.
हे ही वाचा >> “सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?” मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
गुन्हे दाखल केले म्हणून आम्ही घाबरणार नाही : मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणून आम्ही घाबरणार नाही. शांततेत काम करत असताना तुम्ही आम्हाला अडकवायला लागलात तर हा समाज तुम्हाला माफ करणार नाही. याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी असा काढयाचा का, की तुम्हीच हे घडवून आणताय. मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की, तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्हीच हे सगळं जाणून-बुजून घडवून आणताय का?