जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण राज्यातील सरकारसुध्दा उलथून टाकू शकतो, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी दिला. आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडमुठेपणा करण्याऐवजी मराठा आरक्षणाचा विषय समजून घेतला पाहिजे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथून शहागड, पैठण, शेवगाव, पांढरी पूल, आळेफाटा मार्गे मराठा समाज शिवनेरी गडावर मुक्कामासाठी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूरमार्गे रात्री मुंबईत आझाद मैदानावर पोहोचेल. २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उपोषणास सुरुवात होईल. आंदोलनाच्या ठिकाणी कीर्तन, भजन आणि शाहिरांच्या पोवाड्यांचे कार्यक्रम होतील.

आपण चार महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची तारीख दिली होती. परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. या काळात आरक्षण दिले असते तर आम्हाला मुंबईकडे येण्याची गरज पडली नसती. न्या. शिंदे यांच्या समितीला ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत यासाठी आणखी कोणत्या आधाराची आवश्यकता आहे? असा प्रश्न उपस्थित करून मनोज जरांगे म्हणाले, आम्ही आमचे हक्काचे आरक्षण मागण्यासाठी मुंबईला जात आहोत. कुणाला त्रास देण्यासाठी आम्ही जात नाही.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचा निर्णय जाहीर करावा, सगेसोयऱ्यांच्या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी आणि त्याबाबत आमच्या सूचना लक्षात घ्याव्यात, मराठा आंदोलकांवरील गुन्हे आणि खटले मागे घ्यावेत, आंदोलनात बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना शासकीय नोकरी आणि आर्थिक अनुदान द्यावे इत्यादी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या. हैदराबाद, सातारा संस्थान व मुंबई गॅझेटियरचा विचार मराठा आरक्षणाच्या संदर्भात केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या आईबद्दल कधी अपशब्द काढले? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, असे अपशब्द निघाले असतील तर ते आपण मागे घेतो. फडणवीस यांनी अकारण आपल्या नादी लागू नये. मराठा समाजास आरक्षण द्यायचे जीवावर आले असल्यामुळे ते आता आईच्याआड लपत आहेत. मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देणे ही मुख्यमंत्री फडणवीस यांची जबाबदारी आहे. यासाठी मागील राज्य सरकारमध्ये ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आड येत होते आणि स्वतः मुख्यमंत्री झाल्यावरही आरक्षण देत नाहीत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.