Manoj Jarange Patil Mumbai LIVE Today : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासह दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या आरक्षण समर्थकांना आंदोलनाचा अधिकार असला तरी त्यांना मुंबई ठप्प करण्याचा, नागरिकांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला. त्यानंतर, आता मराठा आंदोलकांनी मुंबई सोडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलक ठाण मांडून बसले होते त्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला नवी मुंबईतील खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केली होती. त्यानुसार आता आंदोलकांनी खारघरची वाट धरली आहे.

दुसऱ्या बाजूला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरच्या परिसरात उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवल्या असून या भागातील वाहतूक व्यवस्था आता सुरळीत झाली आहे. तसेच वाशी, ऐरोली व ठाणे येथे नाकेबंदी करण्यात आली असून मराठा आंदोलकांच्या गाड्या शहराच्या बाहेरच रोखल्या जात आहेत. केवळ आंदोलकांना पोहोचवली जाणारी अन्नधान्याची मदत मुंबईत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Live Updates

Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Aarkshan Andolan Live Updates : मराठा आरक्षणासाठी मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स वाचा एकाच क्लिकवर.

11:55 (IST) 2 Sep 2025

"मनोज जरांगे, नामुष्की टाळायची असेल तर…", भाजपाचं आवाहन; म्हणाले, "ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका…"

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज? अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत पाहायला मिळथ आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महात्मा गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यांसमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे."

"आता वेळ आहे थांबण्याची!. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व कॅाग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!"

11:33 (IST) 2 Sep 2025

"पोलिसांकरवी आमच्यावर लाठीहल्ला केला तर…", मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा; "आम्ही तुमच्या शहरांत…"

Manoj Jarange vs Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे की "पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावाल, तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल." ...अधिक वाचा
10:58 (IST) 2 Sep 2025

"आम्हाला आझाद मैदानातून हाकललं तर...", मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी कारण पुढे करून मराठ्यांना आझाद मैदानावरुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही मुंबई पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते तुमच्यासाठी घातक असेल. मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल."

10:50 (IST) 2 Sep 2025

पोलिसांची आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस, मनोज जरांगेंनी सांगितलं पुढचं नियोजन

Manoj Jarange Patil on Mumbai Police Notice : "आम्हाला तुरुंगात टाकल्यास आम्ही तुरुंगात बसून उपोषण करू", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...अधिक वाचा
10:07 (IST) 2 Sep 2025

सीएसटी, बृहन्मुंबई महापालिका चौकातील चित्र बदलले

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महापालिका चौकातील गर्दी वेगाने कमी होत आहे. चौकातील वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांच्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

09:56 (IST) 2 Sep 2025

Maratha Reservation Protest Mumbai Police Notice : आझाद मैदान रिकामे करा… मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांची नोटीस

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे उल्लंघन केल्याने १ सप्टेंबर रोजी आंदोलनाबाबत मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. ...वाचा सविस्तर
09:28 (IST) 2 Sep 2025

मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करावं लागणार, मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना एक नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पोलिसांनी जरांगे यांना म्हटलं आहे की आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजीच्या अंतरिम आदेशात दिलेल्या निर्देशांचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे १ सप्टेंबर २०२५ रोजी तुम्ही सादर केलेल्या विनंती अर्जानुसार तुम्ही मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.

09:23 (IST) 2 Sep 2025
"शब्द जपून वापरा", निलेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा

नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हात टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले आहेत, कौटुंबिक राहिले आहेत, ते तसेच राहिले पाहिजेत. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन... आपल्या कडून पण तीच अपेक्षा आहे.