Manoj Jarange Patil Murder Conspiracy Allegations: मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जरांगे पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यानंतर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकली आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरे आहे का? मला ही गोष्ट कळाली. त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली. कारण मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सरकारने संरक्षण देणे गरजेचे आहे.”

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना जरागे-पाटील पुढे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत रहावे. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे.”

गेल्या तीन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे. या दरम्यान त्यांचे सरकार आणि ओबीसी नेत्यांशी मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला आहे.

याचदरम्यान जरांगे-पाटील आणि या ओबीसी नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दीक चकमक होते. अशातच अलिकडे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता जरांगे-पाटील यांच्या हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आले आहे.