महाराष्ट्रात एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील गेल्या महिन्यात जालन्यात उपोषणाला बसले होते. दरम्यान. या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन चर्चेत आलं. तसेच या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर राज्य सरकारला जरांगे पाटलांची दखल घ्यावी लागली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन देत जरांगे पाटलांना त्यांचं उपोषण मागे घ्यायला लावलं.
मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र दिलं जावं, तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसमोर मांडल्या आहेत. परंतु, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाऊ नये. यासाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अनेक ओबीसी नेते आंदोलनं करू लागले आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत ओबीसी आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे उपोषणाला बसले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. दरम्यान, ओबीसी संघटनांच्या आंदोलनांवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आपण या आंदोलनाचं समर्थन करतो, असं त्यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही ओबीसी आंदोलनाचं समर्थन करता, मग ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांचं समर्थन करता का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी त्यांच्या मागण्यांचं समर्थन करत नाही.
हे ही वाचा >> आता राजकारणात उतरणार? मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करत म्हणाले…
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ओबीसी बांधव आंदोलन करत आहेत, आंदोलन केलंच पाहिजे. कशाचंही असो, कोणाचंही असो, धनगर समाजाचं असेल, मुस्लीम अथवा दलित बांधवांचं असेल, आंदोलन केलंच पाहिजे. आंदोलन हा आपल्याला आपल्या राज्यघटनेनं दिलेला अधिकार आहे. आंदोलनाद्वारे आपल्या मागण्या मांडणं, त्या मंजूर करून घेणं हे आपण केलंच पाहिजे. आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यांनीही खूप आंदोलनं केली आहेत. आपल्या देशात आंदोलनं ही सुरूच असतात. तो विषय इतका मोठा नाही. परंतु, आपल्याला राज्य शांत ठेवायचं आहे. एकमेकांच्या विरोधात जायचं नाही. म्हणूनच सर्वांना आवाहन केलं आहे की, शांततेत आंदोलन करा. आमचं आंदोलनही शांततेत सुरू आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहील.