scorecardresearch

“मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट आहे की काय?” अमित ठाकरेंच्या मिश्किल टिप्पणीवर पिकला हशा!

अमित ठाकरे म्हणतात, “२० दिवस मी सांगून सांगून वैतागलो की ती खोटी बातमी आहे!”

“मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट आहे की काय?” अमित ठाकरेंच्या मिश्किल टिप्पणीवर पिकला हशा!
अमित ठाकरेंचा खोचक टोला!

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून त्यासंदर्भात खोचक प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संजय राऊतांवर खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून शनिवारी पत्रकार संघात मनसे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी संवाद साधून भूमिका मांडण्यासंदर्भात काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अमित ठाकरेंना विनंती केल्यानंतर अमित ठाकरेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला.

नेमकं झालं काय?

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणीसंदर्भात अमित ठाकरे दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिक मनसे पदाधिकारी आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. शनिवारी त्यांनी यासंदर्भात पुणे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हजेरी लावली होती. काही स्थानिक मनसे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी यावेळी साधला. यावेळी बोलताना एका मनसे पदाधिकाऱ्यानं त्यांना मिश्किलपणे वृत्तवाहिन्यांसमोर भूमिका मांडून त्यांना बातम्या देण्यासंदर्भात विनंती करताच अमित ठाकरेंनी त्यावरून संजय राऊतांचं नाव घेत टोला लगावला. यावेळी आपण त्यांची रिप्लेसमेंट नाही, असं देखील अमित ठाकरे म्हणाले.

मंत्रीपदाच्या अफवांबद्दल बोलत होते अमित ठाकरे

अमित ठाकरेंना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या. त्याबद्दल बोलताना “२० दिवस मला रोज हेच विचारलं जायचं की मंत्रीपद मिळणार आहे का? हे खोटं वृत्त असल्याचं सांगून सांगून मी कंटाळलो. शेवटी मी म्हटलं गृहमंत्रीपद देणार असतील तर विचार करेन”, असं अमित ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

“…त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका; संख्याबळाच्या मुद्द्यावर केलं सूचक वक्तव्य!

यावर बोलताना मनसे पदाधिकाऱ्याने तुम्ही माध्यमांशी बोलून इतर मुद्द्यांवर त्यांना बातमी पुरवायला हवी, अशी मिश्किल विनंती करताच अमित ठाकरे म्हणाले, “ते काम संजय राऊत करत आहेत ना!” अमित ठाकरेंनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, यावर एकाने स्पष्टीकरण देताना “सध्या ते आत (ईडी कोठडी) आहेत”, असं म्हणताच “मी काय संजय राऊतांची रिप्लेसमेंट आहे का?” असा प्रश्न अमित ठाकरेंनी हसत हसत विचारला. यावर उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला!

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns amit thackeray mocks sanjay raut says i am not his replacement pmw

ताज्या बातम्या