Amit Thackeray on CM Post: राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे माहीम विधानसभेतून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. यानिमित्ताने त्यांचा मतदारसंघात घरोघरी जाऊन सहकुटुंब प्रचार सुरू आहे. तसेच ते अनेक ठिकाणी मुलाखतीही देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा एक व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मुख्यमंत्री होण्याबद्दल भाष्य करताना दिसले. मागच्या दोन निवडणुकांत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आलेला आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या घोषणेमुळे आमदारांची संख्या वाढणार का? आणि भाजपाशी केलेली जवळीक निकालात लाभदायक ठरणार का? या दोन प्रश्नांची चर्चा होताना दिसत आहे.

अमित ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये स्वतःचे खासगी आयुष्य आणि राजकारणात सक्रिय होण्यापर्यंतच्या अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. वडील राज ठाकरे यांच्याशी असलेले भावनिक नाते आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही अमित ठाकरे भरभरून बोलले. वडिलांप्रमाणेच आपणही सुरुवातीला व्यंगचित्र काढत होतो, पण पुढे शिक्षण आणि इतर कामामुळे हा छंद जोपासणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मी मुख्यमंत्री झालो तरीही…

राज ठाकरेंशी असलेल्या नात्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी मुख्यमंत्री झालो तरी साहेबांचा मुलगा म्हणूनच माझी ओळख असेल. माझ्यासाठी वडील आणि मुलाचं नातं खूप महत्वाचं आहे… ते सगळ्याच्या पलीकडे आहे. नाती आयुष्यभर जपली पाहिजेत, हीच माझी भावना आहे.” यावर तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे म्हणाले की, तो निर्णय राज ठाकरे घेतील. लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरे यांनी हे भाष्य केले.

हे वाचा >> Amit Thackeray : “उद्धव ठाकरेंसारख्या लोकांपासून मी चार हात लांब, कारण..”, अमित ठाकरेंचं वक्तव्य

मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात कधीच आलो नसतो, असेही अमित ठाकरे म्हणाले. सध्या राजकारणात जी परिस्थिती आहे, ती पाहता राजकारणात येण्याची माझी इच्छा झाली नसती. आपल्या देशात जी तरुणाई मोठ्या संख्येने आहे, ती इतर देशाकडे नाही. या तरुणांच्या ताकदीवर आपण जगात पुढे जाऊ शकतो. या तरुणांचा आवाज म्हणून मी राजकारणात आलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले?

भाऊ आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ठाकरे बंधूत स्पर्धा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता अमित ठाकरे म्हणाले की, मी त्याकडे लक्ष देत नाही. माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे. मला राज साहेबांपर्यंत पोहोचायचे आहे. माझी खरी लढाई ती आहे.