अहिल्यानगर : राहुरी शहरातील नगर – मनमाड रस्त्यावरील अपघाताची मालिका आजही सुरूच राहिली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काल, बुधवारी राहुरीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांविरुद्ध आज, गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुन्हा राहुरी कारखाना येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. आज राहुरी फॅक्टरी येथे कंटेनरने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नितीन बापूसाहेब ढोकणे (वय ३२, रा. राहुरी कारखाना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या १० दिवसांतला हा पाचवा बळी आहे.
या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे म्हणून राहुरीत आंदोलने सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयासमोर दशक्रिया विधी व मुंडन आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे अडकले होते. त्यामुळे पोलिसांना धावपळ करावी लागली.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला म्हणून वसंत कदम, अनिल येवले, प्रशांत मुसमाडे, प्रशांत काळे, संदीप कोठुळे, गोविंद खावडे, सुनील विश्वासराव, आदिनाथ कराळे, बाळासाहेब लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंदर्भात हवालदार अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
रस्ता दुरुस्त करावा व अपघातात अनेकांचा बळी गेल्याने ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असताना आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने संताप व्यक्त होत आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले व राज्य सरकारचा निषेध केला. आज राहुरीचा आठवडे बाजार होता. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. वाहतूक नियंत्रक पोलीसही रस्त्यावर दिसत नव्हते.
नगर जिल्ह्यातून जाणारा मनमाड रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्याच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था संपलेली नाही. रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी दोनदा निविदा काढण्यात आल्या. मात्र, ठेकेदारांनी अर्धवट कामे सोडून दिली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते.