“तुतारी ही फक्त आता स्टेजवर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी वाजविली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मिळालेली तुतारी ही फक्त स्टेजवर स्वागतासाठीच वाजविली जाईल, सामान्य माणसांपर्यंत या तुतारीचा आवाज पोहोचणार नाही. ती मर्यादीत राहिल”, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे यांचा काळ आता संपला असून त्यांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी झाली असल्याचेही अनिल पाटील म्हणाले.
“वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…”, पक्षचिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाडांचा नवा नारा
तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीचे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक खोचक पोस्ट एक्सवर टाकली होती. “वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, अशी घोषणाच त्यांनी केली होती.
“राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं आहे. एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. ८४ वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण ८६ वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजली आहे, युद्धासाठी आम्ही आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. लडेंगे और जितेंगे.. परत एकदा सांगतो.. वाजवा तुतारी”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.
शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “१९९९ साली…”
जितेंद्र आव्हाड यांच्या या घोषणेवर अनिल पाटील यांनी पलटवार केला. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांचीच तुतारी बंद होणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनात चाटूगिरी करण्याशिवाय दुसरे काहीही काम केलेले नाही. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणलेला नाही.”
एकनाथ खडसे दिशाहीन
“एकनाथ खडसे यांची परिस्थिती घर का, ना घाट का, अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना भवितव्य दिसत नाही. तर भाजपामध्ये त्यांना कुणी घेत नाहीये. त्यामुळे जावं तर कुठे जावं, अशी परिस्थिती खडसेंची झाली आहे. त्यामुळे दिशाहीन जर कोणतं नेतृत्व असेल तर ते खडसे साहेबांचं आहे, असं मला वाटतं. एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये घ्या, असं म्हणणारा एकही भाजपाचा कार्यकर्ता मला दिसलेला नाही”, असेही अनिल पाटील म्हणाले.