शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार आहेत, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. “२०१४ मध्ये भाजपाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मात्र तेव्हा शिवसेनेला साधं शपथविधीचं निमंत्रण देखील देण्यात आलं नव्हतं. दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेतील बंडखोर आमदार भाजपासमोर लोटांगण घालत आहेत,” अशी टीका महेश तपासे यांनी केली.

महेश तपासे म्हणाले, “बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक आरोप केला की, जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली ती शरद पवार यांच्यामुळे फुटली. दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य अतीशय बेजबाबदार आहे. त्यांना शिवसेनेचा नीट इतिहास माहिती नसावा. त्या त्या काळात जे लोक शिवसेनेबाहेर पडले त्याची कारणं काय होती हे केसरकरांना माहिती नसावं.”

“…तेव्हा भाजपाने शिवसेनेला साधं शपथविधीचं निमंत्रण देखील दिलं नव्हतं”

“बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांचे संबंध किती मधुर होते हे केसरकरांना माहिती नाही. २०१४ मध्ये भाजपाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मात्र तेव्हा शिवसेनेला साधं शपथविधीचं निमंत्रण देखील देण्यात आलं नव्हतं. दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेतील बंडखोर आमदार त्याच भाजपासमोर लोटांगण घालत आहेत,” असा टोला महेश तपासे यांनी बंडखोर शिंदे गटाला लगावला.

“शरद पवारांचा काहीही संबंध नाही”

“शिंदे गट व दीपक केसरकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना होईल, अश्रू येतील अशी कृती करत आहेत. यात शरद पवारांचा काहीही संबंध नाही,” असंही तपासे यांनी नमूद केलं.

“२०१९ मध्ये शरद पवारांनीच शिवसैनिकांचा स्वाभिमान वाचवला”

महेश तपासे पुढे म्हणाले, “वास्तविक, २०१९ मध्ये शरद पवार यांनीच सर्व शिवसैनिकांचा स्वाभिमान वाचविण्याचे कार्य केले होते. शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांची मूठ एकत्र बांधली आणि शिवसेनेकडे महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रीपद आलं. दिपक केसरकर यांना याचा विसर पडला असावा. त्यांचं सरकार बेकायदेशीर आहे हे संबंध जगाला माहिती आहे.”

हेही वाचा : शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दीपक केसरकर बेकायदेशीर सरकारचे प्रवक्ते”

“सर्वोच्च न्यायालयाचं संविधान पीठ कधी बसतं आणि निकाल कधी येतो हे सर्वासमोर असेल. दीपक केसरकर बेकायदेशीर सरकारचे प्रवक्ते आहेत,” अशी टीकाही तपासे यांनी केली.