मला बिपीन आणि अशोक दोघेही सारखेच आहेत. तालुक्याच्या पाटपाण्याच्या प्रश्नावर कोसाका कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, मात्र गोदावरी कालवे व इंडिया बुल्सला दिलेल्या पाण्याचा प्रश्न न्यायालयाच्या मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी संघर्षच करावा लागेल असा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी केला.  
संजीवनी कारखान्यांच्या ५१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोल्हे म्हणाले, देशात मागील हंगामात २४७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. चालू वर्षी २४५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. साखरेला उठाव नसल्याने व परदेशातून येथे स्वस्तात आयात होणाऱ्या साखरेमुळे मागील व चालू हंगामात ११० लाख टन साखर शिल्लक राहील. त्यामुळे पुढील वर्षी साखरेचे भाव २ हजार ७०० पेक्षा कमी राहतील. देशात साखर शिल्लक असताना आयात का होते हे समजत नाही. आयात साखरेवर ३० टक्के कर लागू करावा व साखर निर्यातीसाठी जसे ३०० रुपये वाहतूक अनुदान व इतर सवलती दिल्या जात होत्या तसा निर्णय पुन्हा होणे अपेक्षित आहे, तरच साखर उद्योग व त्यावर अवलंबून असणारे घटक टिकतील असे ते म्हणाले.  
जिल्हय़ातील एका खासगी कारखान्यांचे ऊसउत्पादक सभासदांचे ८७ कोटी रुपयांचे देणे थकविले, त्यांना कुणी विचारीत नाही. सहकारी साखर कारखान्यांच्या मात्र सतत मागे लागतात अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त केली. इंडिया बुल्स प्रकल्पाला पाणी देण्यासाठी शासनाने १६ जानेवारी व ८ फेब्रुवारी २०१२ रोजी दोन करार केले. त्या वेळी येथील आमदारांनी विधिमंडळात काय दिवे लावले, त्यांनी या प्रश्नांवर जाहीर चर्चा का केली नाही असा सवाल असे कोल्हे यांनी केले.