केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकारी म्हणतील तसं सरकार चालणार नाही, असं स्पष्ट मत व्यक्त केलं. तसेच अधिकाऱ्यांनी फक्त ‘येस सर’ म्हणायचं आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही दिला. ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ नावाचा प्रकल्प सुरू केलाय. त्याचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन गडकरी म्हणाले, “मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसं सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त ‘येस सर’ म्हणायचं आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा. आम्ही म्हणू तसं सरकार चालेल. त्यामुळे मी सर्व कायदे तोडून ४५० गावं जोडली. कधी मेळघाटला गेलं तर ते दिसेल. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने तेथील लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास झाला.”

“वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते”

रस्त्यांची कामं आणि वनविभागाच्या वर्तनावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “मी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे २,००० मुलांचा मृत्यू झाला. तेथील ४५० गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितलं, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला.”

हेही वाचा : सोलापूर-औरंगाबाद प्रवासाला ४ तासाचा दावा, प्रत्यक्षात ६ तास का लागतात? पत्रकारांच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले…

“तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे”

“या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari say government will work according to ministers not officers rno news pbs
First published on: 09-08-2022 at 19:36 IST