मुंबई आणि परिसरात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातही दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातही एका चार वर्षीय मुलगा मॅनहोलमध्ये पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. नालासोपाऱ्यातील तुलिंज येथील बिलालपाडा भागातील हा मुलगा आहे. पावसाचं पाणी तुंबल्याने मॅनहोलचं झाकण पालिका कर्मचाऱ्यांनी उघडलं होत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालिका कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. अजून मुलगा बेपत्ता असल्याने चिंता वाढली आहे.
अनमोल सिंग हा चार वर्षीय मुलगा घरातून सकाळी बाहेर पडला होता. त्याचे पालक घरीच होते. मात्र खूप वेळ होऊनही अनमोल घरी आला नसल्याचं पाहून त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मॅनहोल उघडं असल्याच्या अनमोलच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या आहेत. यासाठी वसई अग्निशमन दलाचीही मदत घेतली जात आहे.
चौकशीसाठी ‘ईडी’समोर कधी हजर होणार? अनिल देशमुखांनी दिलं उत्तर
राज्यात पुढील पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट
१९ ते २३ जुलै रोजी हवामानविभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.