Ashadhi Wari Pandharpur History Significance विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला!, विठ्ठल, विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग गात, माऊली-माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात पंढरीची वारी करतात. पंढरीची ही वारी साधारण २५० किमीची असते. या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरु झाली, वारीचा मार्ग कुठला? या सगळ्याची माहिती आपण जाणून घेऊ.
वारी म्हणजे नेमकं काय?
वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा आहे.
वारकरी हा शब्द कसा तयार झाला?
आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार, मंगळवार, बुधवार असं म्हणतो, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं याला वारी म्हटलं जातं. वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. या संप्रदायचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणे. बाप रखुमादेवी विठ्ठलाचा वारेकरु ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे. ती शब्दार्थाच्या पलिकडे जाणारी आहे. इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडला आहे.

विठ्ठल नेमका कोण आहे?
१३ व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबाकाका, जनाबाई हे सगळे होते. १३ वं शतक म्हणजे संतांची मांदियाळी असं मानलं जातं. तेराव्या शतकातल्या सगळ्या संतांनी विठ्ठलाचा, पंढरपूरचा आणि वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केला आहे. यादवांचं राज्य जेव्हा होतं त्यातही वारीचे उल्लेख आहे. १३ व्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय महाराष्ट्रात होता यात काही शंकाच नाही. वारी नेमकी कधी सुरु झाली ते सांगता येत नाही. पण १३ व्या शतकात वारीचे उल्लेख आहेत. शंकराचार्यांनी पांडुरंगांचं स्त्रोत्र रचलं होतं. त्यांचा काळ हा आठव्या शतकापासूनचा आहे. त्यामुळे पांडुरंगाचे संदर्भ हे आठव्या शतकापासून आपल्याकडे आहेत यात काही शंकाच नाही. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण. पुंडलिकाची गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकासाठी आला. त्यामुळे विटेवर पुंडलिकाने त्याला उभं केलं. विठ्ठल म्हणजेच कृष्ण मूर्तीरुपाने उभं केलं. त्यामुळे विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण. वारकरी संप्रदाय म्हणजे कृष्णसंप्रदायही आहे. भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय असं आपण त्यांना म्हणू शकतो, पण कृष्ण संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय बरेच आहेत पण वारकरी ही फक्त महाराष्ट्राची खासियत आहे. वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर, नामदेव यांच्याही आधीपासून सुरु झाली अशी माहिती सदानंद मोरेंनी दिली.
महाराष्ट्रातून किती पालख्या पंढरीच्या दिशेने निघतात?
महाराष्ट्रात २०० ते २५० पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत. पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.
संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी निघते.
संत सोपनकाका पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव यांनी सासवड (जि. पुणे) येथे समाधी घेतली होती. त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते.
श्री संत मुक्ताई पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील कोथळी (ता.मुक्ताईनगर) हे त्यांचे समाधीस्थळ. त्या ठिकाणावरुन संत मुक्ताई यांची पालखी निघते. या पालखीतील वारकरी तब्बल 560 किलो मीटरचा पायी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना 33 दिवस लागतात.
संत एकनाथांचा पालखी सोहळा : संत एकनाथांची पैठण (छत्रपती संभाजीनगर) येथे कर्मभूमी आहे. त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघते.
संत गजानन महाराज यांची पालखी : शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो. सलग ३१ दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते
संत ज्ञानेश्वर यांची पालखी : श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी. त्या ठिकाणावरुन संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.
संत तुकाराम यांची पालखी : संत तुकाराम यांची पालखी देहू येथून निघते. संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटले जाते.
वारी का केली जाते?
वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. वारीमध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि एकत्र प्रवास करतात, ज्यामुळे सामुदायिक भक्तीची भावना वाढते. वारीच्या माध्यमातून लोक विठ्ठलाची प्रार्थना करतात, कीर्तन आणि भजनाद्वारे त्याची स्तुती करतात आणि भक्ती व्यक्त करतात. वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात, ज्यामुळे एक सामुदायिक भावना आणि बंधुभाव निर्माण होतो. वारी एक मोठी धार्मिक परंपरा आहे, जी विठ्ठल भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे. वारीमध्ये सगळे एकमेकांचा उल्लेख माऊली असाच करत असतात.

महाराष्ट्रात वारीइतकी जुनी सांस्कृतिक परंपरा नाही
महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संताना वगळून व्याख्या करता येणार नाही. वारी ही खूप जुनी परंपरा आहे. परंतु पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही. पालख्या संताच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. १६८५ मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरु केला. जगदगुरु नारायण महाराज यांनी सुरु केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा ‘टर्निंग पाईंट’ म्हणता येईल. त्यांनी वेगवेगळ्या गावावरुन जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या. त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. त्या वेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या. दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबा हे भजन सुरु झाले. १६८५ पासून १४७ वर्ष या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती. त्यानंतर १८३२ मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जावू लागल्या. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीस येतात.
वारीमध्ये रिंगण सोहळा कसा सुरु झाला?
भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..भक्तिने भारलेला रिंगण सोहळा पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं गेलं आहे. वारीतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. वारीत मराठा सरदार सहभागी होत होते. त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरु केली. मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत असत. त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरु केला. त्यामुळेच एखाद्या लष्कारी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते. तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते. या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. त्यात दोन अश्व सहभागी होतात. यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो. त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर अश्व मोकळा सोडलो जातो. हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. त्यावेळी माउली, माउलीचा गजराने परिसर दुमदुमुन जातो. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो. या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररित्या धावतात. वारीत मेंढ्यांचं रिंगणसुद्धा केलं जातं. संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे रिंगण होते. या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन पळतात. ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात.
महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या, पालख्या येतात. महाराष्ट्राचं एकीकरण हे पंढरपूरला होतं. खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणांहून वारकरी दिंडी घेऊन येतात. महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरुन समतेचा पाया रचला आहे. त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही.