“मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे,”असं सांगणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाची सुप्त ईच्छा त्यांच्या समर्थकांच्या तोंडून बाहेर पडू लागली आहे. एरवी बीडमध्ये रेल्वे आली पाहिजे असं म्हणणाऱ्या बीडकरांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं, अशी मागणी केली. सावरगावमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर बोलत असताना मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री करण्याची घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू राहिल्याने अमित शाह यांनाही भाषण काही मिनिटात उरकावं लागलं.

दरवर्षीप्रमाणे भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे मंगळवारी आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उपस्थित होते. अमित शाह यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे अमित शाह काय बोलणार याकडे लक्ष होते. पण, प्रत्यक्ष दहा-पंधरा मिनिटातच शाह यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर अमित शाह यांनी बोलायला सुरूवात केली. शाह यांनी ३७०चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी एकच घोषणा द्यायला सुरूवात केली. घोषणा होती.. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची. अमित शाह बोलत असताना हमारी मुख्यमंत्री कैसी हो, पंकजा मुंडे जैसी हो, सीएम… सीएम… सीएम अशा घोषणा मुंडे समर्थ देत राहिले. गर्दीतून घोषणांचा स्वर वाढतच जात असल्याने शाह यांनी काही मिनिटात भाषण संपवले आणि रवाना झाले. या घोषणा सुरू असताना मात्र, पंकजा मुंडे या हात जोडून बसल्या होत्या. त्यामुळे पंकजा यांना हे अपेक्षित नव्हतं का अशी चर्चा सभेनंतर सुरू झाली.

व्हिडीओ येथे पहा

शाह यांच्यासमोर पंकजांचं प्रचंड शक्तीप्रदर्शन

दसरा मेळाव्याला अमित शाह येणार असल्याने पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. पंकजा यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांनी मेळाव्यासाठी रॅलीच काढली होती. तर त्यांच्या कार्यकर्त्यानींही स्वतःला झोकून दिल्याचं चित्र सभास्थळी होतं.