राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अनिल देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी अनिल देशमुखांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

चौकशीला हजर झाल्यानंतर अनिल देशमुखांनी माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत? असा सवाल केला होता त्यांनी केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या फरार प्रकरणाला वेग आला आहे. या संदर्भात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत केली असेल असा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत असे म्हटले आहे.

त्यानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते ते कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत असेही म्हटले आहे.

“पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही तपासा, तिथले सीडीआर रिपोर्ट तपासा, तिथल्या पोलिसांकडून माहिती घ्या. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते. ही माझी माहिती नाही तुम्ही पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता. परमबीर सिंग त्यांच्या जवळ होते मग त्यांनाच विचारले पाहिजे ना का पळाले आणि कुठे गेले आहेत? परमबीर सिंग यांच्याकडे फक्त अनिल देशमुखांचीच माहिती नाही आहे. सुशांत सिंह राजपूतचे काय झाले? दिशा सालियानचे काय झाले?  ही सर्व माहिती सुद्धा त्यात परमबीर सिंह यांच्याकडे आहे. दिशा सालियानच्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाली. या सर्व माहितीचा कटोरा परमबीर सिंग यांच्याकडे पण आहे. म्हणून परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत, असे नितेश राणे म्हणाले.

“जुन्या महापौर बंगल्यावर सगळे तासन् तास बसून असायचे. तेव्हा परमबीर सिंग चांगले होते का? मग आज का व्हिलन झाले आहेत? तुम्हाला माहिती असेल तर घेऊन या,” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.