प्रशांत देशमुख

लगतच्या करोनाबाधित जिल्ह्यातून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असली तरी यातून तातडीची सेवा म्हणून रूग्णांसाठी सवलत देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीच्या आधारे यवतमाळ आणि अमरावती येथून मोठ्या प्रमाणावर रूग्ण वर्ध्यातील सावंगी येथील रूग्णालयात दाखल होत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी असताना वर्धा जिल्हा प्रशासनाने खबरदारीची सर्व ती पावले टाकली आहेत. मात्र, रूग्णसेवेचा अपवाद असल्याने यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रामाणावर रूग्ण सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रूग्णालयात आणि शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होत आहेत. तेथील प्रशासनाच्या परवानगीनेच हे रूग्ण सावंगीत दाखल होत असल्याने मनाई करता येत नाही.

दीर्घकालीन आजार व अन्य स्वरूपातील रूग्ण सावंगी येथेच उपचार करण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून आले. प्राप्त माहितीनुसार, यवतमाळच्या रूग्णालयात करोनाच्या रूग्णांसाठी उपचार होत आहेत. ती भिती बाळगून रूग्ण सावंगीत येत असल्याचे काही रूग्णांशी बोलल्यावर समजले. यवतमाळ येथे मेंदू आजारावरील तज्ज्ञ नसल्याने त्या उपचारासाठी येथे येणे अपरिहार्य ठरते. शिवाय काही रूग्णांनी राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ सुरूवातीपासून सावंगीला घेतला आहे. त्यात खंड पडू नये म्हणून त्यांच्यासाठी इथेच उपचार घेणे गरजेचे ठरते.

यामध्ये एका रूग्णासोबत त्याचा एक नातलग आणि वाहनचालक येतो. वाहनचालक हा रूग्णसेवेनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. त्यामुळे त्याच्या माध्यमातून करोना विषाणू संक्रमित होण्याची भीती रूग्णालय प्रशासनाला आहे. खबरदारी म्हणून रूग्णालयाने या जिल्ह्यांतून आलेल्या रूग्णांसह संबंधितांना विलगीकरण करण्याची तयार ठेवली. तसेच रूग्णांसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार ठेवून त्याच ठिकाणी आल्याबरोबर दाखल केले जाते. मात्र परिचारिका व कर्मचारी पातळीवर भितीचे वातावरण असल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून दिसून आले.

याबाबत रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी उदय मेघे म्हणाले, “या दोन जिल्ह्यांतून सावंगीला येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत या काळात निश्चितच वाढ झाली आहे. केवळ आवश्यक त्याच रूग्णांना या ठिकाणी उपचारार्थ पाठवावे, अशी अपेक्षा आहे. बहुतांश रूग्णावरील उपचार यवतमाळ व अमरावतीत शक्य आहेत. आम्ही जबाबदारी टाळत नाही, मात्र प्रश्न विषाणू प्रसाराचा असल्याने प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे.” तर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार म्हणाले, ‘रूग्णसेवेला लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे. या समस्येवर वारंवार चर्चा झाली आहे. पण रूग्णांना रोखणे अश्यक्य आहे.