अहिल्यानगर : दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा व त्यासाठी गोदामात साठवून ठेवलेला, स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित करण्यात आलेला ४५० गोण्या तांदूळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. जप्त केलेल्या तांदळाची किंमत ११ लाख २२ हजार रुपये आहे. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील गोदामावर पोलीस पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या कारवाईची माहिती दिली. भानसहिवरे (ता. नेवासा) येथील गोदाम मालक संदीप सुभाष शिंदे (वय ३५) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत संदीप शिंदे याने हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित करण्यात आला होता व विविध ठिकाणांहून त्याचा साठा भानसहिवरे येथील गोदामात करण्यात आल्याची कबुली दिली आहे.

संदीप शिंदे याने हा तांदूळ करजगाव (ता. नेवासा) येथील भगवान पुंड व परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळ्या बाजारात खरेदी करून तो संजय अग्रवाल गजानन ॲग्रो (करोडी, छत्रपती संभाजीनगर) यास विक्री करण्यासाठी घेतल्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक कबाडी यांनी सांगितले.

पोलिसांनी गोदामाची पंचांसमक्ष पाहणी केली असता तेथे गोण्यांमध्ये तांदूळ असल्याचे आढळले. ४५० गोण्यांमध्ये एकूण २२ हजार ५०० किलो तांदूळ आहे. पोलीस अंमलदार प्रकाश मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमाद्वारे संदीप शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार संतोष खैरे, रमीझराजा अत्तार, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिवाळी सणानिमित्त दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारकांना केंद्र व राज्य सरकारकडून स्वस्तात तांदूळ उपलब्ध केला जातो. हाच तांदूळ विविध ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानातून एकत्र करून तो भानसहिवरे येथील गोदामात साठवण्यात आला होता व नंतर त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाणार होती.

पोलिसांच्या तपासात छत्रपती संभाजीनगर येथील गजानन ॲग्रो या कंपनीमध्ये साठवलेला तांदूळ पाठवला जाणार होता, असे आढळले आहे. पुरवठा विभाग शिधापत्रिका धारकांच्या संख्येच्या प्रमाणात धान्य वितरित करते. मात्र, हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यापूर्वीच त्याला पाय फुटले जातात. परिणामी लाभार्थी वंचित राहण्याच्या घटना घडतात.